मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली…

मुंबई (बारामती झटका)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आमरण उपोषण करण्यासाठी येणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कारण, साखळी उपोषणासाठी मुंबईत कार्यकर्त्यांसह येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना रोखावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेलो नाहीत, असे सुनावत न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.
ही सुनावणी मुख्य न्यायाधिश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर पार पडली. सदर याचिका हेमंत पाटील यांनी दाखल केली होती. मराठी आरक्षणासाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी निघणार आहेत. ते 26 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या येण्याने मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना मुंबईत येण्यापासून रोखावे अशी विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर आज सुनावणी पार पडली.

यावेळी खंडपीठाने नमुद केले की, आम्ही त्यांना कसे अडविणार ? हे आमचे काम नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीत. यापेक्षा बरीच महत्त्वाची कामे आमच्याकडे आहेत, अशा शब्दांत याचिकादार हेमंत पाटील यांना सुनावले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.