मेहनतीच्या बळावर भरारी – खडकीच्या युवा कीर्तनकार प्राची सरवदे झाल्या विधीज्ञ

करमाळा (बारामती झटका)
“दो अक्षर का होता है लक, अढाई अक्षर का होता है भाग्य, तीन अक्षर का होता है नशीब और साढ़े तीन अक्षर की होती है किस्मत… ये चारों के चारो शब्द मेहनत के सामने छोटे पड़ जाते हैं.”
या ओळी जीवनातील मेहनतीचे महत्त्व अधोरेखित करतात. योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले, तर यश मिळवणे अशक्य नसते, याची प्रचिती खडकी येथील युवा कीर्तनकार कु. प्राची सरवदे यांच्या माध्यमातून आली आहे.
ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या प्राची यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण, अध्यात्म, साहित्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय वाटचाल केली आहे.
खडकी येथे पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयात आठवी ते दहावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पूर्ण केले. शालेय जीवनातच त्यांनी मोठे स्वप्न पाहिले.

जीवनात काहीतरी वेगळं करायचं आणि न्यायव्यवस्थेत योगदान द्यायचं. याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी पुण्यातील नामांकित आय.एल.एस. विधी महाविद्यालयात २०२१ मध्ये प्रवेश घेतला. पाहता पाहता पाच वर्षांचा प्रवास पूर्ण करत त्यांनी एलएलबीची पदवी यशस्वीरित्या संपादन केली.
विशेष म्हणजे, शिक्षणासोबतच अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांची वाटचालही तितकीच प्रभावी राहिली. सन २०१५ पासून वडील ह.भ.प. आसराजी सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वारकरी संप्रदायाची वाट धरली. गायन, भजन, कीर्तन यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. गेल्या आठ वर्षांपुर्वी त्यांनी बाल कीर्तनकार म्हणून किर्तन सेवा सुरु केली. आज ते विविध सप्ताहातून कीर्तन सेवा देत आहेत. कीर्तन, प्रवचन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
ॲड. प्राची यांना साहित्याचीही विशेष आवड आहे. “स्वप्नपंखांचे नभ” हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून विविध कवी संमेलनांमध्ये त्या सक्रिय सहभागी होतात. वाचन, लिखाण आणि सांप्रदायिक कार्य यामध्येही त्यांचा उत्साह उल्लेखनीय आहे.
त्यांच्या यशामागे कुटुंबाचेही मोठे योगदान आहे. आई छायाताई सरवदे या अंगणवाडी शिक्षिका असून वडिलांचा किराणा व्यवसाय आहे. कुटुंबातील संस्कार आणि प्रोत्साहनामुळेच कु. प्राची यांनी विविध क्षेत्रांत झेप घेतली आहे. त्यांची लहान बहीण प्रज्ञा बी.एस्सी.चे शिक्षण घेत असून भाऊ ओंकार बारावीचे शिक्षण पूर्ण करुन तो ही एल.एल.बी. करण्याचे स्वप्न पाहत आहे.
भविष्यात न्यायव्यवस्थेत जाऊन न्यायाधीश होण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र, त्या दरम्यान वकिलीच्या माध्यमातून विशेषतः महिलांना आणि मुलींना न्याय मिळवून देण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकारण करणे, समाजातील चुकीच्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा याविरोधात जनजागृती करणे, तसेच कीर्तन, प्रवचन आणि कवितेच्या माध्यमातून सकारात्मक विचार समाजापर्यंत पोहोचवणे, हे त्यांचे भविष्यकालीन उद्दिष्ट आहे.
खडकीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण, अध्यात्म, साहित्य आणि समाजकारण यांची सांगड घालत प्राची सरवदे यांनी उभी केलेली ही प्रेरणादायी वाटचाल अनेक युवक-युवतींसाठी दिशादर्शक ठरणारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…
डाॅ. ॲड. बाबूराव हिरडे
करमाळा. मो. नं. ९०११३५५३८९
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



