ताज्या बातम्यासामाजिक

जीवनभर कल्याणकारी कर्म हाच तर गौतम बुद्धांचा धम्म ! – प्रा. डॉ. सुभाष वाघमारे

निढळ (बारामती झटका)

करुणाशील गौतम बुद्धांनी ईश्वर, स्वर्ग, नर्क अशा कल्पनांना महत्व न देता सदाचरण केल्याने सुख कसे मिळते हे दाखवून दिले. पंचशीलाचे पालन केले तर आयुष्यातील अनेक दुःखापासून आपण मुक्त होतो आणि हाच सुखी जीवनाचा मार्ग असल्याचे बुद्धांनी सांगितले. बुद्ध धम्म सर्वांचे मंगल होण्यासाठीची आचारसंहिता आहे. मन घडवेल तसा माणूस घडत असतो. मनाला चांगले वळण लावणे, योग्य संकल्प करणे, वाणीचा हितकारी उपयोग करणे, व्यभिचार न करणे, दारू सारख्या विविध व्यसनातून मुक्त होणे, हिंसा होणार नाही अशी वर्तणूक करणे, स्वतःला ज्ञानी आणि विचारी बनवणे, स्वतःच्या मनात कोणत्याही वाईट प्रवृत्तींना स्थान न देणे, दान करणे, कुशल कर्मे करणे हा व्यवहार सुखमय करणारा विचार बुद्धांनी दिला आहे. जीवनभर कल्याणकारी कर्म करणे हेच बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आहे, असे मत येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषामंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते निढळ येथे संबोधी विकास मंडळ आयोजित केलेल्या गौतम बुद्ध जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रमेश इंजे होते. यावेळी डॉ. प्रल्हाद इंजे, हनुमत इंजे, राजाराम इंजे, आबा इंजे, विशाल इंजे, गौतम इंजे, विनोद इंजे, छाया वैद्य संबोधि विकास मंडळातील पदाधिकारी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

वर्तमानकालीन समाजात निर्माण झालेल्या समस्यांची मुळे दैववादी, विषम विचारधारेचे परिणाम आहेत, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, बुद्ध धम्म हा शिस्तीचा व समजूतदारपणाचा विचार आहे. मनाची बेशिस्त ही अनेकांच्या आयुष्यात दुःखाला कारण ठरलेली आहे. माणूस नीट वागत नाही परिणामी, त्याचा संसार आणि व्यवहार नीट होत नाही. तात्पुरत्या लाभासाठी काही माणसे खोटे बोलतात, मारामारी करतात, कोणाचा जीव घेतात,बलात्कार करतात, धाक दाखवतात हे चांगल्या मनाचे लक्षण नाही. मोकाट सुटलेल्या मनामुळे अनेक वाईट घटना घडतात. म्हणून आपल्या मनाचे घर सुद्धा चांगले शाकारून घ्यावे लागते. ज्या वस्तूमुळे आपले नुकसान होणार आहे, त्या गोष्टीपासून अलिप्त राहणे आवश्यक असते. विश्वासू माणूस बनण्यापेक्षा लोक दगा फटका करतात. व्यसनाने बरबादी होते तर काहीजण व्यसनाला प्रतिष्ठीत करतात. अनैतिक व्यवहार करायला जातात. त्यांना सदुपदेश करणाऱ्या माणसाचा राग यायला लागतो.

आपल्या हिताच्या चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या माणसाला किंमत द्यायला हवी. पण, स्वार्थ प्रबल असल्याने तृष्णा, हपापलेपण, अधाशीपणा वाढतच आहे. कष्ट करून सन्मार्गाने पैसे कमविण्याऐवजी भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळविण्यासाठी उचापती करणे याचे आता काही वाटत नाही. त्यामुळेच मग समाजात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दगदग, धावपळ, अतिरेक हेच जीवन असेल तर त्यांचे परिणाम देखील आयुष्यावर होत असतात. म्हणूनच नितीमत्ता पाळून मध्यममार्गाने हळू हळू प्रगती झाली तरी चालेल पण शील पालन करायला हवे. निर्व्यसनी रहायला हवे, उच्च शिक्षण घ्यायला हवे, कोंबडीचे पंख लावण्यापेक्षा गरुडाचे पंख लावून चांगली ध्येये पूर्ण करायला हवीत. बुद्धांच्या अष्टांग मार्ग व दहा पारमिता यांचा शांतपणे अभ्यास करून आपले मन चांगल्यासाठी तयार करायला हवे. बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून हा चांगला जीवन मार्ग आपल्याला दिला आहे. चांगली ध्येये अखंड परिश्रम करून पूर्ण करायला हवीत. आपण चांगले आचरण करून समाजातील सर्वांना प्रेरणा द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद इंजे यांनी केले. संबोधी विकास मंडळ निढळ मार्फत प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला. बुद्धवंदना घेण्यात आली. प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या तर्फे निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षिका यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. तर डॉ. प्रल्हाद इंजे, रमेश इंजे परिवार यांचे मार्फत संभाजी इंजे व मुक्ता इंजे, कृष्णाजी इंजे, मंगल इंजे यांच्या स्मरणदिनाचे औचित्य साधत शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना वहया, पेन्सिल, पेन, खोडरबर व अहिल्यादेवी होळकर यांची पुस्तके भेट देऊन त्यांना यश मिळावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी धम्मपालन गाथा व सरणत्तय घेण्यात येऊन जयंती कार्यक्रम सांगता झाली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort