पहिली ते चौथी लहान मुलांच्या शाळा शासन निर्णय नियमाने भराव्यात, त्रस्त पालकांची अपेक्षा व लहान मुलांच्या इच्छा…
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गट गटशिक्षण अधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का ? महिला वर्गातून संतप्त सवाल…
अकलूज (बारामती झटका)
शासनाने जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील पहिली ते चौथी लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ वाजता भराव्यात, यासाठी शासन निर्णय केलेला आहे. मात्र, काही शाळा शासन निर्णयाचे नियम धाब्यावर बसवून सकाळी सात वाजता सुरू होत आहेत. त्यामुळे पहिली ते चौथी लहान मुलांच्या शाळा शासन निर्णयानुसार भराव्यात, अशी त्रस्त पालकांची अपेक्षा आहे. तर लहान मुलांमधून सुद्धा नऊ वाजता शाळा भरण्याची इच्छा व्यक्त होत आहे. याकडे माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का ?, असा संतप्त सवाल महिला वर्गातून होत आहे.
शासनाने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लहान मुले इंग्रजी माध्यमांपासून मराठी माध्यमांमध्ये यावीत, यासाठी मराठी शाळांमध्ये सुख-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवरून शाळेची मुले जर सात वाजता शाळेमध्ये आली तर त्यांची शि व सू व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पोटाचे विकार वाढले जातात. लवकर उठून शाळेत यावयाचे असल्याने उपाशी पोटी यावे लागते. शासनाने नऊ वाजता शाळा सुरू केलेली आहे. त्यामुळे लहान मुलांचे प्रात:विधीसह सर्व काही सुरळीत सुरू आहे. यामुळे महिला वर्गामध्ये समाधान होते.
मात्र, काही शाळा शासनाचे नियम धाब्यावर बसवून सकाळी सात वाजता शाळा सुरू करत आहेत. सध्या थंडीचे दिवस आहेत, गोरगरीबच नाही तर, श्रीमंतांच्या मुलांचीसुद्धा अडचण होत आहे. तरी शासन निर्णयाप्रमाणे नऊ वाजता शाळा सुरू करावी, अशी महिला वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
काही पालकांना आपली मुले सकाळी सातला जाऊ किंवा नऊला जाऊ याचे देणे घेणे नसते. पाल्य शाळेत जातो एवढ्यावरच समाधान असते. मात्र, काही पालक आपला पाल्य भविष्यामध्ये सुसंस्कृत विद्यार्थी, लोकसेवा व महाराष्ट्र सेवा आयोगाच्या परीक्षा देऊन चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हावा, यासाठी लहानपणापासूनच त्याच्या मनावर चांगल्या प्रकारे शिक्षण व संस्कार व्हावेत यासाठी धडपडत असतात. मात्र, अशा नियम धाब्यावर ठेवणाऱ्या शाळेंमुळे पाल्यांचे नुकसान होते. यामुळे पालक वर्गात तीव्र नाराजीचा सूर येत आहे.
गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गांभीर्याने घेऊन सकाळी सातला सुरू होणाऱ्या शाळेवर कारवाई करून नऊ वाजता सुरळीतपणे सुरू कराव्यात, अशीही सुज्ञ पालकांमधून सूचना येत आहे. शाळेच्या वर्ग खोल्यांची अडचण खाजगी संस्थाचालक दाखवत आहेत. असा शिक्षण अधिकाऱ्यांच्या बोलण्यामधून सूर येत आहे. तरीसुद्धा शासन नियमाने शाळा सुरू व्हाव्यात अशी चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.