राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितला कालावधी
नागपूर (बारामती झटका)
राज्यातील विधानसभांच्या निवडणुका संपन्न होऊन नवीन सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिंमडळ विस्तार होऊन पहिलं अधिवेशनही पार पडलं. त्यामुळे, लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका कधी होतील, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. कारण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असून गेल्या 2 ते अडीच वर्षांपासून नगपालिका व महापालिकांच्या निवडणुकाच घेण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे सध्या या संस्थांचा कारभार प्रशासनाकडून पाहिला जात आहे. यासंदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना कालावधी सांगितला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील मंत्री आणि नवनिर्वाचित भाजप आमदारांचा जाहीर सत्कार केला जात आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री आज नागपुरात असून त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. “मला असं वाटतं की, जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. आम्ही देखील याबाबत सातत्याने विनंती केली आहे, मला अशी अपेक्षा आहे की, जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊन निकाल देईल. त्यानंतर, जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, अर्थात निवडणुकांच्या तारखा ठरवायचा अधिकार हा आमचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. आम्ही देखील सरकार म्हणून या प्रकरणी जास्तीत जास्त प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात हे पाहत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंच्या बॅनर संदर्भातील पत्रावरही भूमिका
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी होर्डींग्ज संदर्भात लिहिलेल्या पत्रावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उत्साहाच्या भरात बेकायदा होर्डींग्ज लावतात. आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावले होते, पण मी ते काढायला लावले. या अनधिकृत होर्डींग्जसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्याचे पालन केलं जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलं.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I loved as much as you’ll receive carried out right here. The sketch is tasteful, your authored material stylish.