आरोग्यताज्या बातम्या

रक्तदाब म्हणजे काय ?

बार्शी (बारामती झटका)

आपल्या हृदयासंबंधी कवीमंडळींनी कितीही रमणीय कल्पना केलेल्या असल्या तरी सरतेशेवटी तो एक पंप आहे. फुफ्फुसाकडून शुद्ध होऊन आलेलंरक्त तो धमन्यांद्वारे शरीरभर खेळवत राहतो. हे साध्य करण्यासाठी हृदय प्रसरण आणि आकुंचन पावतं. साधारणपणे दर मिनिटाला हृदयाचे ७२ ठोके पडतात. म्हणजेच दर मिनिटाला हृदय ७२ वेळा प्रसरण पावतं आणि तितक्याच वेळा ते आकुंचन पावतं. जेव्हा ते प्रसरण पावतं तेव्हा त्याच्या डाव्या खालच्या कप्प्यातील रक्त धमन्यांमध्ये जोरानं फेकलं जातं. या वेगानं आलेल्या रक्ताच्या लोंढ्याचा दाब धमन्यांच्या भिंतीवर पडतो. याला सिस्टॉलिक दाब म्हणतात. ते जेव्हा आकुंचन पावतं त्यावेळीही रक्ताचा दाब धमन्यांच्या भिंतीवर पडतोच पण तो कमी असतो. याला डायॅस्टाॅलिक रक्तदाब म्हणतात. डॉक्टर हा दाब मोजतात तेव्हा त्यांच्याकडच्या स्फिग्मोमॅनाॅमीटर या उपकरणातला पारा तिथल्या नळीत उभा राहतो. त्याच्या उंचीच्या रूपात हा दाब मोजला जातो. जेव्हा हृदयालं रक्त वेगानं धमन्यांच्या भिंतीवर येऊन आदळतं तेव्हा हा दाब निरोगी व्यक्तीच्या शरीरात १२० मिलिमीटर असतो. आणि जेव्हा पुढच्याच क्षणी ते आकुंचन पावतं तेव्हा हा ८० मिलिमीटर इतका घसरतो. त्यामुळेच रक्तदाब हा नेहमी या दोन आकडय़ांच्या रूपात सांगितला जातो. १२० ओव्हर ८० हा सर्वसामान्य दाब मानला जातो. जेव्हा या यापैकी कोणताही दाब या मर्यादांपेक्षा वाढतो तेव्हा त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची लागण झाल्याचं निदान केलं जातं. अर्थात १२० काय किंवा ८० काय ही सरासरी झाली. त्यामुळे तो आकडा १२५ किंवा ८४ झाल्यास लगेच उच्च रक्तदाबाचे निदान केलं जात नाही. पण तेच आकडे ९० किंवा १३० असे दिसू लागले तर मात्र सावधगिरी बाळगली जाते. तेच आकडे १४० किंवा १०० झाले तर मात्र उच्च रक्तदाबाच्या विकारावर उपाययोजना करून तो परत सामान्य स्तरावर आणण्याचे प्रयत्न केले जातात. कारण तसं केलं नाही तर सततच्या वाढीव दबावापोटी धमन्या तर कमकुवत होतातच, पण हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यताही वाढीस लागते.

निरोगी व्यक्तीच्या शरीरातही रक्तदाब सतत सामान्य स्तरावरच राहतो असं नाही. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तो निरनिराळी पातळी गाठतो. माणूस झोपेत असतो तेव्हा रक्तदाब घसरतो. उठल्यावर मात्र तो चढतो. काही जणांच्या बाबतीत तर ते बसलेले असताना सामान्य पातळीवर असणारा रक्तदाब उभे राहताच घसरतो. अशा वेळी मग चक्कर आल्यासारखं होणं किंवा डोळ्यापुढे अंधारी येणं अशी लक्षणे दिसू लागतात. काही औषधांचा प्रभाव रक्तदाबावर पडून त्याच्या पातळीत बदल होऊ शकतात. वयोमानाप्रमाणेही रक्तदाबात बदल होतात. काही वेळा तर डॉक्टर रक्तदाब मोजत आहेत याच ताणापोटी रक्तदाब वाढतो. म्हणूनच कोणाचाही रक्तदाब मोजताना तो दिवसाच्या एकाच वेळी आणि ठराविक अवस्थेतच मोजला जातो. खास करून उच्च रक्तदाबाचं निदान करताना एकाच वेळेच्या मोजमापावर विसंबून न राहता वेगवेगळ्या वेळी आणि अधिक वेळा मोजमाप करून मगच निदान केलं जातं.

संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button