ताज्या बातम्यासामाजिक

श्रीपूर पोलिस औट पोस्ट गावाबाहेर नेल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था

श्रीपूर (बारामती झटका)

अकलूज पोलिस स्टेशन चे अंकीत असलेलं श्रीपूर पोलिस औट पोस्ट गेल्या दोन वर्षांपासून गावा बाहेर नेल्याने या पोलिस औट पोस्ट ची असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था झाली आहे.

विशेष म्हणजे या पोलिस औट पोस्ट मध्ये कोण अधिकारी कार्यरत आहेत, कोण सहाय्यक फौजदार, ठाणे अंमलदार तसेच पोलिस कॉन्स्टेबल कार्यरत आहेत, हेच अनेकांना माहीत नाही. गेल्या वर्षभरात येथील एक एपीआय दर्जाचे अधिकारी वगळता येथील त्या खालोखाल दुय्यम दर्जाचे अधिकारी ठाणे अंमलदार पोलिस कर्मचारी यांची दोन वेळा बदली अकलूज पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. दर सहा महिन्यांनी स्टाफ बदलला जात आहे.

पोलिस औट पोस्ट गावाबाहेर नेल्याने श्रीपूरमध्ये रहदारी वाहतुक प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून पंधरा दिवसांत घरफोडी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले झुमके व अन्य दागिने हिसकावून नेल्याचे प्रकार वाढले आहेत. एकटी दुकटी महिला गवत, सरपण आणायला गेली की, मोटार सायकल वरुन दोघे व्यक्ती पाठीमागून अचानक येतात. हाताने हिसका मारून प्रसंगी त्या महिलेला मारहाण करून लुटण्याचे दहा ते बारा घटना गेल्या वीस दिवसांत झाल्या आहेत. ठिकाण दुसरे पण प्रकार तोच व अज्ञात चोरट्यांचे तंत्र तेच आहे. त्यामुळे श्रीपूर परिसरात महिला वर्गात घबराट पसरली आहे.

एवढे गुन्हे होऊनही पोलिसांना एकाही गुन्ह्याचा छडा लावता आलेला नाही. तसेच अल्पवयीन मुले मोटारसायकल ची पुंगळी काढून कर्णकर्कश आवाजात सर्व रस्त्यांवर सुसाट वेगाने वहान चालवत आहेत. अनेकांना धडक देऊन ते रोड रोमियो तरुण अपघात करून पळून जात आहेत. यात गेल्या तीन चार वर्षांत वहानाने धडक देऊन महिना दोन महिने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाले आहेत. अशा अनेक घटना होत आहेत. मात्र त्या दहशतखोर व दंडेलशाही करणारे रोड रोमियो यांच्या नादी कोणी लागत नाहीत. जखमी झालेले अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण जायबंदी अवस्थेत आहेत.

एकंदरीत श्रीपूर पोलिस औट पोस्ट गावाबाहेर नेल्याने नागरिक, जनता पोलिस यांचा सुसंवाद राहिलेला नाही. पोलिस औट पोस्ट मध्ये केव्हा येतात, केव्हा जातात, याचा ताळमेळ नाही. तसेच येथे ड्युटी वर कार्यरत असलेले पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी रात्री श्रीपूर मध्ये न राहता अकलूज येथे मुक्कामी जातात. अचानक रात्री अपरात्री केव्हा काही दुर्घटना, अन्य घटना घडल्यास संबंधित तक्रारदार यांना अकलूज पोलिस स्टेशनमध्ये दाद मागण्यासाठी जावे लागते, ही मोठी अडचण आहे. या पुर्वी गेली पंच्याहत्तर वर्षे पोलिस औट पोस्ट साखर कारखान्याचे बांधकाम खोलीत होते. गावात असल्याने संबंधित अधिकारी पोलिस यांचा गावात परिसरात संपर्क असायचा. काही अनुचित घटना, प्रसंग निर्माण झाल्यास पोलिस तात्काळ हजर रहात त्यामुळे पोलिसांचा वचक भिती होती. पोलिस औट पोस्ट गावाबाहेर नेल्याने सर्व अडचणी वाढल्या आहेत, वचक राहिला नाही. वहातुक कोंडीमुळे रहदारीचा प्रश्न बिकट बनला आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालल्याने कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button