सुभाष चौकाचे श्रीराम चौक म्हणून नामकरण करा, शिवसेना-भाजप युतीची मागणी

करमाळा (बारामती झटका)
करमाळा शहरातील सुभाष चौकाचे श्रीराम चौक म्हणून नामकरण करा, अशी मागणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे केली आहे. अशा प्रकारचा ठराव करून त्याची तात्काळ इतिवृत्तात नोंद घ्यावी, अशी मागणीही केली आहे.
22 जानेवारी रोजी संपूर्ण देशात राम मंदिराचा जल्लोष होत असून या निमित्तानेच करमाळ्यातील ऐतिहासिक सुभाष चौकाचे नामकरण श्रीराम चौक म्हणून करावे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही या मागणीला पाठिंबा देऊन तसेच शिफारस पत्र जिल्हाधिकारी, सोलापूर यांना पाठवले आहे. तसेच करमाळा नगरपालिकेच्या प्रशासक प्रियंकाताई आंबेकर यांनाही निवेदन दिले आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश दादा चिवटे व भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, ॲड. प्रिया आगरवाल, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया, भाजपा शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक, पत्रकार विशाल नाना घोलप, रितेश कटारिया, चंद्रकांत राखुंडे, स्नेहल कटारिया, वनराज घोलप, कृष्णा वाशिंबेकर आदींच्या उपस्थितीत मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत बोलताना महेश चिवटे म्हणाले की, सुभाष चौक हे नाव कशामुळे पडले याचा कसलाही इतिहास उपलब्ध नाही. या चौकाला श्रीराम चौक नाव देण्यासाठी शहरातील सर्व समाजाच्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हा ठराव तात्काळ पारित करून सुभाष चौकाचे नामकरण श्रीराम चौक म्हणून करावे.
शहरात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असून सुभाष चौकाला श्रीराम चौक नाव देण्यास सर्व मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. 22 जानेवारी च्या शुभ मुहूर्तावर नामकरण करावे. – अलीम बागवान भाजीपाला विक्रेते

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.