सुमित्रा पतसंस्थेचे ठेवीदार व खातेदार हवालदिल, घरे-दारे उध्वस्त झाली, तारणहाराच्या शोधात….

अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील सुमित्रा पतसंस्थेचे महाराष्ट्रात नाव झालेले होते. साडेसात वर्षात ठेवीला तिप्पट रक्कम अशी ख्याती होती, त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब, नोकरदार, व्यापारी यांनी सुमित्रा पतसंस्थेत आपली आयुष्याची पुंजी ठेवीच्या रूपाने बँकेत ठेवलेली होती. अनेकांनी घर, जमीन, जागा विकून पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या होत्या. मात्र, सुमित्रा पतसंस्थेचे ठेवीदार व खातेदार हवालदिल झालेले आहेत. अनेकांची घरेदारी उध्वस्त झाली आहेत. सुमित्रा पतसंस्थेचे ठेवीचे व खात्यावरील पैसे परत मिळावे यासाठी तारणहाराच्या शोधामध्ये ठेवीदार व खातेदार आहेत.
सुमित्रा पतसंस्थेने ठेवी बरोबर खातेदारांना कर्ज वाटप सुद्धा केलेले होते. कोट्यावधी रुपयाच्या ठेवी खातेदाराने ठेवलेल्या होत्या. पतसंस्था सुरळीत चाललेली होती मात्र, डेल सारखी फसवी साखळी असलेली स्कीम आली आणि पतसंस्थेच्या ठेवीदार व खातेदार यांच्यावर गंडांतर आले. सदरच्या स्कीममध्ये पैसे गुंतवण्याकरता गुंतवणूकदारांकडे पैसे नसतील तर पतसंस्थेने नामी युक्ती लढविलेली होती. उतारा घेऊन कर्ज प्रकरण केले जात होते. कालांतराने कर्जदारांच्या उताऱ्यावर बोजे चढविले गेले होते. त्यामुळे एकत्रित कुटुंब यांच्यामध्ये वाद विवाद व वितुष्ट निर्माण झालेले होते. मुद्दल त्यामध्ये व्याज मिसळल्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेलेली होती. कर्जदार व जामीनदार यांनी घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट तिप्पट रक्कम भरली तरी सुद्धा कर्ज त्यांच्या नावेच होते, असे सभासदातून बोलले जात होते. तर दुसरीकडे ठेवीदार व खातेदार यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. अनेकांनी न्यायालयीन मार्ग अवलंबला होता, तरीसुद्धा ठेवीदार व खातेदार यांना वेळेवर पैसे मिळालेले नाहीत. अनेकांच्या घरांची स्वप्ने धुळीला मिळाली. कित्येक ठेवीदारांची मुलामुलींची लग्न रखडली गेली, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अशा कठीण परिस्थितीतून जात असताना ठेवीदारांचे पैसे मिळतील की नाही, अशी मनामध्ये शंका उपस्थित होत असल्याने सुमित्रा पतसंस्थेचे ठेवेदार व खातेदार हवालदील झालेले आहेत. घर-दार उध्वस्त झालेले आहे, त्यामुळे तारणहार कोणीतरी व्हावा आणि आमच्या पैशाची तजबीज होण्याकरता पुढाकार घ्यावा, अशी भावना ठेवीदार व खातेदार यांच्यामधून होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.