कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याची जिल्हाप्रमुखांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

करमाळा (बारामती झटका)

कांद्याचे भाव प्रचंड घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज वर्षा येथे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय मांडून महेश चिवटे यांनी सविस्तर निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, शाखाप्रमुख संजय साने आदी उपस्थित होते.

अचानक कांद्याचे दर उतरल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून अनेक शेतकऱ्यांनी उभा कांदा पिकात नांगर घालण्यास सुरुवात केली आहे. कांद्याचे दर निर्यात बंदी उठल्यास वाढू शकतात‌. निर्यात बंदी उठवण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असून यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करावा. तसेच नाफेड मार्फत कांदा खरेदी महाराष्ट्रात सुरू असून त्याचे सेंटर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सुरू करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शिवधनुष्य यात्रा फिरणार असून या माध्यमातून गाव तिथे शाखा उपक्रम राबवून येणाऱ्या तिथीनुसारच्या शिवजयंतीस सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरी करावी, असे आदेश पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी दिले.

करमाळा नगरपालिकेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधण्यासाठी दिलेला ४५ लाखाचा निधी, तसेच प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी व सांस्कृतिक भवनसाठी ४ कोटी रुपयांच्या निधीवरची स्थगिती ठेवल्याबद्दल उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. व या सर्व कामाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळ्यात यावे, असे निमंत्रण शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपिसेवाडीचे ग्रामसेवक बनकर यांच्या कारकिर्दीतील कामांची सखोल चौकशी करण्याचे गटविकास अधिकारी यांचे आदेश.
Next articleमाळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती, युवा नेते तुषार पाटील यांच्या मागणीला वाढता पाठिंबा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here