डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत मातंग चर्मकार रामोशी वडार समाज का सहभागी होत नाही – बी. टी. शिवशरण

माळशिरस (बारामती झटका)

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा पगड जाती धर्म समुह यांच्यावर हजारों पिढ्या झालेला अन्याय, अत्याचार, जुलमी छळ, पिळवणूक थांबवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांना स्वाभिमान, स्वातंत्र्य, माणुसकीचे हक्क मिळवून दिले. संविधानात उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित, मागासवर्गीय बहुजनांना हक्क, सवलती बहाल केल्या. त्या युगप्रवर्तक, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठेही, कधीही फक्त महार समाजालाच सवलत देणार, त्यांचेच फक्त कल्याण करणार, असे म्हटले नाही. मात्र शहरी भागात काही अपवाद वगळता महाराष्ट्रात ग्रामीण भागातील महार समाज सोडला तर मातंग समाज, चर्मकार समाज, रामोशी, वडार समाज व इतर बहुजन समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत सहभागी होत नाही. त्यांना वाटतं किंवा त्यांचा असा समज आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महार समाजाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही का त्यांची जयंती साजरी करायची किंवा सहभाग घ्यायचा.

मात्र, सर्वात अगोदर आणि सर्वात जास्त सवलतींचा लाभ व लाभार्थी चर्मकार समाज आहे. ते आजही महार, मातंग समाजापेक्षा स्वतःला उच्च समजतात. मातंग समाज आणि महार समाज यांच्यात एकमत कधी होत नाही, याला एकनाथ आव्हाड, सुकुमार कांबळे व हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही विचारवंत, मातंग नेते, कार्यकर्ते अपवाद असू शकतात. रामोशी, वडार, होलार, पारधी, कैकाडी व इतर बहुजन समाज डॉ‌ बाबासाहेब आंबेडकर यांनी महार समाजासाठी कार्य केले आहे, अशा स्वप्नात आहेत. माळी समाज यांच्या बाबतीतही वेगळं काही सांगता येणार नाही. तेही त्यांच्या कोशातून बाहेर पडत नाहीत, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेची, ज्ञानाची, त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल सगळ्या जगाने घेतली. पण, इथल्या मनुवादी व्यवस्थेने बहुजन समाज अशिक्षित व धर्म, जात, पंथ तसेच दगडा धोंडयाचे देवाची भीती दाखवून त्यांचेवर वाईट संस्कार घडवण्याचं पापं केले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि तो घेणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असा संदेश दिला. माणसाला माणसांचे हक्क, स्वातंत्र्य, न्याय नाकारणारी व्यवस्था त्यांनी बदलून टाकली.

तेहतीस कोटी देवांना जे दलितांना माणूस असताना माणुसकीचे हक्क मिळवून देता आले नाहीत ते स्वातंत्र्य, न्याय, माणुसकी, हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवुन दिले. ही जाणीव फक्त महार समाजालाच आहे का ?, इतरांनी फक्त सवलती, लाभ घेऊन आपलं सामाजिक जिवनमान, आर्थिक स्तर उंचावणे यातच समाधान मानलं, ही भळभळती जखम नव्हे का ? महार समाज सोडला तर त्या इतर समाजाने जयंती नाही केली किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची घरात प्रतिमा नाही लावली म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व, त्यांची योग्यता, त्यांच्या कर्तृत्वाची उंची कमी होणार नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआयुष भारत अंबाजोगाई तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
Next articleराष्ट्रमंचाची माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here