माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी मिळाल्याने फटाक्यांची आतिषबाजी…

अकलूजसह माळशिरस तालुक्यात ठीकठिकाणी उमेदवारीचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा जागांपैकी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिलेले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय व राज्यातील निवड समिती यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी दिल्याने माढा लोकसभा मतदारसंघात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यामध्ये अकलूजसह माळशिरस तालुक्यात ठीकठिकाणी उमेदवारीचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळू द्यायची नाही, असा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील परिवारातील सदस्यांनी चंग बांधलेला होता. तशाप्रकारे प्रयत्नही सुरू होते परंतु, केंद्रीय व राज्यातील नेतृत्व यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली होती. त्यामध्ये सिंचन, रस्ते, रेल्वे मार्ग, एमआयडीसी असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न केलेला होता. केंद्रातील व राज्यातील नेतृत्वाने मतदार संघाच्या विकासासाठी धडपड करणारा खासदार अशी ओळख निर्माण झालेली होती.
भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदार संघात पक्ष वाढीचे काम सुरू होते. त्यामुळे केंद्रातील व राज्यातील नेतेमंडळींसह मतदार संघातील असणारे लोकप्रतिनिधी यांचाही पाठिंबा होता. विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर व विजयसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारीसाठी विरोध असल्याने दोघांचे विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ होते. त्यामुळे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते, समर्थक व मतदार यांनी फटाक्यांची आतीशबाजी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. माळशिरस, नातेपुते, पिलीव, वेळापूर, महाळुंग – श्रीपुर, माळीनगर, सदाशिवनगर, अशा अनेक छोट्या-मोठ्या गावासह अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात फटाक्यांचा आवाज घुमलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.