रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ मोकाट, अद्याप अटक झाली नाही, पोलीस प्रशासनावर संशय..

सचिव ज्ञानदेव राऊत यांची सात दिवसांची पोलिस कस्टडी संपत आली तरी चेअरमन पोलीस स्टेशनची पायरी चढले नाहीत..
माळशिरस (बारामती झटका)
सदाशिवनगर रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ अद्याप मोकाट आहे, त्यांना अजून अटक झाली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे. सचिव ज्ञानदेव राऊत यांची सात दिवसांची पोलीस कस्टडी संपत आली तरी चेअरमन व संचालक मंडळ पोलीस स्टेशनची पायरी चढले नाहीत. याबाबत सदाशिवनगर व सहकार क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू आहे..
रत्नत्रय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सदाशिवनगर, ता. माळशिरस संस्थेचे सचिव ज्ञानदेव पांडुरंग राऊत, संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयाचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, सर्व रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465, 468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला होता.
माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला असून गुन्ह्या मधील मास्टर माईंड रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव उर्फ ज्ञानेश राऊत यांना माळशिरस पोलीसांनी अटक केलेली होती. माळशिरस येथील मेहरबान न्यायालयासमोर उभे केले असता गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्याकरता पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती. पाच दिवसाची पोलीस कस्टडी संपल्यानंतर सोमवार दि. 12/10/2026 रोजी मेहरबान न्यायालयासमोर हजर करून तपास अधिकारी यांनी वाढीव पोलीस कस्टडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने अजून दोन दिवस पोलीस कस्टडी वाढवून दिलेली आहे. माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले पुढील तपास करीत आहेत.

रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन व सर्व संचालकासह खाजगी सावकार व तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणारे यांच्या अटकेसाठी पोलीस प्रशासन यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे चेअरमन व संचालक मंडळ उघड उघड पोलिसांसमोर फिरत आहेत. नातेवाईक म्हणत आहेत, पोलीस अटक करूच शकत नाहीत, मग असे का बोलले जाते, याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे अशी चर्चा सुरू आहे..
नेमकी कशा पद्धतीने शोध मोहीम राबवली याची सविस्तर माहिती घेऊन बातमी दिली जाणार आहे…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



