दिवाळी सुट्टीत चिमुकल्या शाळकरी मुलांनी तयार केल्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती

दिवाळीचा फराळ, अभ्यासाबरोबरच सुट्टीचा सदुपयोग करून आनंद केला द्विगुणित

माढा (बारामती झटका)

दिवाळीची सुट्टी म्हणजे शाळकरी मुलांसाठी धमाल, मस्ती व आनंद लुटण्याची एक पर्वणी असते. नवीन कपडे परिधान करणे, फराळाचे गोडधोड पदार्थ खाणे, परंतु याचवेळी शिक्षकांनी शाळकरी मुलांना दिवाळीचा अभ्यास, पर्यावरणपूरक आकाशकंदील, भेटकार्ड व पणत्या तयार करण्यासाठी सांगितले आहे. काही शिक्षक व सुज्ञ पालकांनी याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा या उद्देशाने विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यास सांगितले आहे.

माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शाळकरी मुले दरवर्षी दिवाळीनिमित्त किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार करून सुट्टीचा सदुपयोग करतात. चिमुकली शाळकरी मुले रायगड, प्रतापगड, राजगड, पन्हाळा, विशाळगड, मुरुड-जंजिरा आदी ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक व हुबेहूब प्रतिकृती बनवतात. दिवाळीच्या सुट्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचे व त्यांनी बांधलेल्या भुईकोट, सागरी व डोंगरी किल्ल्यांचे महत्त्व आणि वारसा यांचे संवर्धन व्हावे याकरिता हा उपक्रम उपयुक्त आहे.

विशेष बाब म्हणजे चिमुकल्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती सहज उपलब्ध होणाऱ्या लाल माती, दगड गोटे, पोतडे व इतर साहित्याचा वापर करून तयार केलेल्या आहेत. त्यावर किल्लेदार, मावळे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून भगवे झेंडे लावून आकर्षक पद्धतीने सजावट केली आहे. काही जणांनी विद्युत रोषणाई सुद्धा केली आहे. हे आकर्षक किल्ले व सुशोभीकरण पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक जमा होतात. चिमुकल्यांचे तोंडभरून कौतुक करीत शाबासकी देतात. पर्यावरणप्रेमी पालकांनी फटाकेमुक्त व प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या चिमुकल्यांना या विधायक व स्तुत्य उपक्रमात गुंतवून ठेवले. विठ्ठलवाडी येथे मेघश्री गुंड, कार्तिकी काशीद, श्रेयस गुंड, अजिंक्य जाधव, क्षितिजा गुंड, वीरेन जाधव, मल्हार काशीद, समृद्धी गुंड, आरव जाधव, मंजिरी गुंड, अविष्कार गुंड, कृतिका खैरे, श्रीतेज गुंड, शरयू जाधव यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी सहभाग नोंदविला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleGuarding the Importance of Business Data
Next articleमाळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीला ओहोटी, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत वाढ, अनेक सेल अध्यक्षांसह असंख्य कार्यकर्त्यांचा संघटनेत प्रवेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here