माळशिरस तहसील कार्यालयात ‘आंधळं दळतंय अन्, कुत्र पिठ खातंय’, अशी दयनीय अवस्था, सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजीचा सूर

माळशिरस तालुक्याची प्रांत नसून अडचण तर तहसीलदार असून अडचण अशी अवस्था…

माळशिरस तालुक्यातील दोन आमदारांचे दुर्लक्ष, पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष वेधून स्टींग ऑपरेशन करतील का ?

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तहसील कार्यालयात अंदाधुंद कारभार सुरू आहे. ‘आंधळ दळतंय अन्, कुत्र पिठ खातंय’, अशी दयनीय अवस्था झाली असून सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे. माळशिरस तालुक्याला प्रांताधिकारी नसून अडचण आहे तर जगदीश निंबाळकर तहसीलदार असून खोळंबा, अशी अवस्था झालेली आहे. माळशिरस तालुक्याला विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते दोन आमदार यांचे तहसील कार्यालयातील अंदाधुंद व बेकायदेशीर कामाकडे दुर्लक्ष आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधून स्टींग ऑपरेशन करतील का ?, असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेमधून येत आहे.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीर मुरूम, माती उत्खनन सुरू आहे. तहसील कार्यालयाकडून या बेकायदेशीर उत्खननाला आर्थिक हितसंबंधांमुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शासनाचा महसूल बुडून स्वतःचा वसूल केला जात आहे‌. बेकायदेशीर उत्खननामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. तहसील कार्यालयाकडे तक्रारी करूनसुद्धा सदरच्या बेकायदेशीर उत्खननांवर काहीही परिणाम होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्खनन करण्यास परवानगी असल्याचे तहसील कार्यालयाकडून बोलले जाते आहे. तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेला किरकोळ कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक लोकांना रेशनचा माल मिळत नाही, काळ्या बाजाराने विकला जातो. सर्वसामान्य जनतेमध्ये तहसील कार्यालयाविषयी नाराजीचा सूर पसरलेला आहे‌. तालुक्यामध्ये बेकायदेशीर उत्खनन सुरू असताना तहसीलदार अथवा महसूल विभागाचे कर्मचारी यांनी कोणत्याही बेकायदेशीर उत्खननानाच्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून दंडात्मक कारवाई केल्याचे जनतेच्या निदर्शनास आलेले नाही. प्रांताधिकारी एक वर्षापासून प्रभारी आहेत, तहसीलदार कायम आहेत. तरीसुद्धा, बेकायदेशीर गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व सामान्य जनतेच्या व्यथा व शासनाचा बुडालेला महसूल यासाठी तहसील कार्यालयाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सर्वसामान्य जनतेमध्ये बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर, श्रीपुर आणि शिवपुरी मळ्यातील जमिनी वाटपापासून वंचित राहिलेल्या खंडकरी शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू
Next articleह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या मातोश्रीचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here