अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, आरक्षण सोडतीने येणार घोट्याला…
माळशिरस ( बारामती झटका )
राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 9 मे 2022 रोजीच्या आदेशामधील तरतुदीनुसार माळशिरस पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत माळशिरस पंचायत समिती सभागृहात दि.13 जुलै 2022 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांचेकडून पर्यवेक्षण अधिकारी म्हणून श्री. नागेश पाटील भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, अशी माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप उपस्थित होते.
आरक्षण सोडत काढत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सन 2002 पासूनच्या आरक्षणाचा विचार करण्यात येणार आहे. तसेच जरी सद्यस्थितीत नव्याने गट आणि गण रचना झालेली असली तरी पूर्वीचे आरक्षण काढताना दि. 9 मे 2022 रोजीच्या आदेशातील तरतुदीनुसार आत्ताच्या गणातील किंवा गटातील 50 टक्के अथवा 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या प्रवर्गासाठी संबंधित वर्षी आरक्षित होती, त्याचा विचार करण्यात येणार आहे.

अनुसूचित जातीसाठी तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार मतदारसंघ राखीव ठेवण्यात येणार आहे तरी लोकप्रतिनिधी व इच्छुक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी केलेले आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना झाल्यापासून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत. आरक्षणानंतर गुडग्याची बाशिंगे आपोआप घोट्याला येण्याची शक्यता आहे. गट आणि गण रचना झाल्यापासून भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालून समाज सेवा करायला सुरुवात केली आहे. माणुसघाणेसूध्दा माणसात मिसळून राहायला लागले आहेत. कधी तोंड न उघडणारे कसं चाललंय, बरं हायका, असे म्हणाय लागले आहेत. मित्र परिवार व नातेवाईक यांना बळच फोन करून खुशाली विचारायला सुरुवात झाली आहे. कधी चहा न पाजणारे जेवणाचा आग्रह करीत आहेत. भावभावकी, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून जेवणाच्या पंगतीतील पत्रावळीसुध्दा उचलून टाकायला सुरुवात झाली आहे.
अनेकजण सर्व सामान्य जनतेकडे तिरक्या नजरेने पाहणारे सरळ नजरेने पाहत आहेत. कार्यकर्ते व मित्र परिवार यांना खर्चाचा ढिला हात सोडून दिला होता, आता आरक्षण सोडतनंतर अनेक इच्छुक उमेदवारांच्या आशेवर पाणी पडणार आहे. खुशी आणि गम एकाचवेळी आरक्षण सोडत झाल्यानंतर पहावयास मिळणार आहे. आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng