अकलूज (बारामती झटका)
सामाजिक बांधिलकी व श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. योगेशदत्त तुकाराम जाधव यांच्या दृष्टिकोनातून व चतुर्थ वर्षामधील रेशीम शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सामाजिक भान ठेवून एक अनोख्या अशा उपक्रमाच्या माध्यमातून दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.
आज वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. बऱ्याच वेळेला तरुण पिढी आपल्या जवळपास असणाऱ्या वृद्धांकडे दुर्लक्ष करताना दिसते आणि हाच एक उद्देश नजरेसमोर ठेवून काही तरुण विद्यार्थ्यांना घेऊन चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णी येथे सदिच्छा भेट दिली. हेतू एकच होता की, त्या वृद्धांच्या मनामध्ये रेखाटलेला गडद काळा रंग काढून काही काळापर्यंत जरी त्यांचे आयुष्य रंगबेरंगी करू शकलो तरी आम्ही स्वतःला नशीबवान समजू, अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

त्या दिवशी विद्यार्थ्यांनी सर्व वृद्धांबरोबर बसून विविध फळे, चिवडा, इडली, सोनपापडी, जिलेबी, वडापाव, बिस्किटे, तिखट पुऱ्या यांचा पोटभर अल्पोपहार केला. त्यानंतर त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध वस्तू जसे की डेटॉल साबण, कपड्याचा साबण, कपडे धुण्याची पावडर, तेल, कोलगेट पेस्ट, व्हॅसलीन, झेंडू बाम, कपडे यांचे स्वतंत्र असे पॅकेट्स करून वाटण्यात आले.
त्यानंतर त्यांच्याशी अडीच ते तीन तास संवाद साधण्यात आला. त्यामध्ये प्रत्येकाची एक वेगळीच व्यथा व कथा ऐकून सर्व तरुण वर्ग मनाने हेलावून गेला होता. त्याचवेळी सर्वांनी मिळून एकच पण केला की, वर्षातील काही दिवस अशा गरजू, अनाथ आणि वयोवृद्ध व्यक्तींबरोबर घालवण्याचा व त्या कालावधीमध्ये त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा.

अशा नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यास सदैव प्रेरणा देणारे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे माजी अध्यक्ष श्री. जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील त्याचबरोबर संस्थेचे सचिव, सहसचिव, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य व सर्व प्राध्यापक वृंदांचे दिलेल्या सहकार्याबद्दल विद्यार्थ्यांनी आभारी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng