ताज्या बातम्यासामाजिक

अकलूज येथे वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस…

वादळी वाऱ्यामुळे झाडे झाली जमीनदोस्त मात्र, जिवीतहानी नाही.

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस, येथे काल सायंकाळी परतीचा पाऊस जोरदार पडला असून रात्री वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडला आहे. या वादळी वाऱ्यामुळे सदुभाऊ चौक, शिवशंकर बझार जवळील आणि आंबेडकर चौक येथे विनायक भगत यांच्या किराणा दुकानावर झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र, दैव बलवत्तर होते म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे.

दिपावलीनिमित्त बाजारपेठेत विविध वस्तूंची आणि पूजनाच्या साहित्यांची दुकाने थाटली होती. पण, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे एकच गोंधळ उडाला असून अनेकांच्या मालाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे छोट्या व्यवसायीकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे बाजारपेठेत मालाला उठाव नसून छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला मंदी असून अनेक व्यवसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. शिवाय वाढत्या महागाईमुळे गोरगरीब जनता ही मेटाकूटीस आली आहे. यावर्षीचा दिवाळी सण महागाईमुळे साजरे करण्यासाठी गोरगरिबांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यात सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदार संघात प्रचारात मग्न असून मतदारांमध्ये मात्र उत्सुकता नसून नाराजी दिसून येत आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे वाढती महागाई आहे. त्यात दिवाळी हा सण महिनाअखेर आल्यामुळे नोकरदारांचा पगार ही झालेला नाही आहे. परंतु, सर्वत्र कमी अधिक प्रमाणात महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे प्राप्त झाले. मात्र एकीकडे महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु, शासनाने महागाई वाढवून लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल केले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनमध्ये प्रचंड नाराजी दिसुन येत आहे.

काल रात्री अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर मोठी झाडे रस्त्यावर पडली तर काही ठिकाणी खांबावरील तारा तुटल्या पडल्या होत्या. पण पाऊस थांबताच अकलूज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे लगेच बाजूला केली तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही क्षणातच विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे अकलूजच्या नागरिकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button