अंगणवाडी सेविकेच्या रिक्त पदाची चुकीची पदोन्नती दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे पिडीत महिलेची धाव
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथील बनकरवस्ती अंगणवाडीतील मदतनीस सौ. रुपाली दत्तात्रय लोंढे यांनी अंगणवाडी सेविकेच्या रिक्त पदाची चुकीची पदोन्नती दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर आणि बालविकास अधिकारी सोलापूर यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. तसे निवेदनही त्यांनी दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दिनांक २/३/२०२३ रोजी बनकरवस्ती येथील सेविकांच्या रिक्त पदाची ऑर्डर जयश्री सुदाम सूर्यवंशी अंगणवाडी गायकवाड वस्ती, वेळापूर यांना प्रकल्प अधिकारी साहेब यांनी साफ चुकीची काढली आहे, अशी तक्रार आहे. शासन निर्णयानुसार सर्वात जास्त गुण असलेले वरच्या क्रमांकावर व कमी गुण असणारे त्याखाली असे आहे. माझे गुण जास्त होते परंतु ते मला साहेबांनी दिले नाही, हा माझ्यावर फार मोठा अन्याय आहे. माझे शिक्षण बीए पूर्ण असून १२ वी नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. तक्रार करायला जायचे तर सुपरवायझर मॅडम यांनी चार वेळा साहेब ऑफिसला नाहीत म्हणून उत्तरे दिली. आम्हाला पात्र अपात्र यादी जाहीर न करता अचानक ३ तारखेला समजले की ऑर्डर मिळाली म्हणून. नंतर साहेबांना विचारले की माझी १२ का ग्राह्य धरली नाही, मला लेखी द्या. तर त्यांनी उत्तर दिले की मार्क ग्राह्य धरले जात नाही तर सेवा जेष्ठतेनुसार काम केले जाते. मग मी त्यांना विचारले दुसऱ्या गावात गुणांवर कसे केले. तर त्यांनी व राऊत क्लार्क यांनी उत्तर दिले की, आपल्या गावापुरते बघा. तर मग सीओ साहेब तुम्हीच मला न्याय द्या. पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच जी.आर. असताना गावागावांमध्ये भरतीत बदल का ? ऑफिसला माहिती मागितली असता उत्तरे देतात की, आम्हाला माहिती देता येत नाही. साहेब फोनवर धमकी देतात की, ऑफिसमध्ये गोंधळ घातला तर पोलीस केस करीन. मला आर्थिक व मानसिक त्रास दिला आहे. तेवढा पगारही मला नाही. माझी परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. साहेब खरोखर मी खूप टेन्शनमध्ये आहे. शेवटचा निर्णय तुमच्यावर आहे.
वेळापूर मध्ये २००८ पासून मी पाहते भरतीमध्ये मदतनीस यांच्यावर नेहमीच अन्याय होत आहे. २०१२ मध्ये सौ. सुनंदा सुतार यांच्यावरही अन्याय झाला आहे. त्यांना त्या वेळचे सीओ साहेबांनी न्याय दिला. २०२० च्या भरतीमध्ये माझ्यावर अन्याय झाला, तेव्हा मी माझी रेगुलर १० असताना सौ. राणी साठे यांची ७ वी पास वाय.सी.एम. फर्स्ट ईयर वर त्यांना घेतले. तेव्हा पण माझे गुण मला समजले नाहीत. मी जातीने हिंदू महार आहे. मला रडण्यापेक्षा व टेन्शनमध्ये काय विपरीत करण्याआधी तुमच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा मी करत आहे. सी.ओ. साहेब प्रत्येक वेळच्या जी.आर.नुसार तुम्ही सांगा बरोबर की चूक आहे ते आणि २०२३ ची भरतीची पूर्ण माळशिरस प्रकल्पाची यादी बघून न्याय द्यावा.
आज मी ग्रॅज्युएट असून देखील सर्व शासन निर्णयानुसार पदोन्नती पदासाठी पात्र असून देखील मला पदोन्नती मिळत नसेल तर मी काय केले पाहिजे. मा. प्र.अ. साहेबांनी मला कशासाठी डावलले आहे. मला ताबडतोब निर्णय पाहिजे. अन्यथा टेन्शनमध्ये काही विपरीत घडल्यास ए.बा.वि.से.यो. माळशिरस सर्व अधिकारी साहेब जबाबदार राहतील.
तरी मेहरबान व कृपावंत होऊन कृपया माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून साहेब तुम्ही स्वतः शासन निर्णयानुसार गुणात बदल करून मला निर्णय द्यावा. दिलेली ऑर्डर चौकशी करून ताबडतोब रद्द करून मला पदोन्नती देऊन सेवा करण्याची संधी द्या ही विनंती. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री, जिल्हा परिषद सोलापूर सी. ओ. साहेब, सोलापूर जिल्हा कलेक्टर साहेब यांना देण्यात आलेल्या आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng