अंधश्रद्धेला फाटा देऊन शिवधर्म पद्धतीने केला तिसरा
वाघोली (बारामती झटका)
दि. १६ जानेवारी रोजी वाघोली येथील प्रतिष्ठित बागायतदार दत्तात्रय नारायण मिसाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. आज दि. १८ रोजी कै. दत्तात्रय नारायण मिसाळ यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम मौजे वाघोली, ता. माळशिरस, येथे झाला. त्यांचे पुत्र माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम अंधश्रद्धेला फाटा देऊन कै. दत्तात्रय नारायण मिसाळ यांच्या अस्थी नदीच्या पाण्यात विसर्जित न करता वाघोली येथील स्मशानभूमीत सामाजिक कार्याचा भाग म्हणून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून अस्थी त्या रोपांच्या खड्ड्यात विसर्जित करण्यात आल्या. अस्थी विसर्जन व वृक्षारोपण करण्यापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ व कै. दत्तात्रय नारायण मिसाळ यांचे प्रतिमाचे पूजन करण्यात येऊन जिजाऊ वंदना म्हण्यात आली. त्याच्यानंतर सदर स्मशानभूमीत मिसाळ यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, गावातील जेष्ठ लोकांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपणावेळी सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनजी जगताप, पंचायत समिती माळशिरसचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे, पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने तसेच माळशिरस तालुक्यातील संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुरेश पवार, समस्त मिसाळ परिवाराचे नातेवाईक, वाघोली व वाघोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कै. दत्तात्रय मिसाळ यांचा अस्थि विसर्जनानंतरचे होणारे सर्वच विधी सातव्या दिवशी करण्याचा निर्णय दिगंबर मिसाळ व त्यांच्या कुटुंबाने या ठिकाणी जाहीर केला. सदर निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून केलेल्या विधीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng