Uncategorized

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा……

अकलूज (बारामती झटका)

“नभी झेपावणारी तू पक्षिणी,
सक्षम, कर्तव्यदक्ष तू गृहिणी,
प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी,
शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी…”

आज ०८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा, यासाठी आज जगभर महिला दिन साजरा केला जातो. याच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज सदाशिवराव माने विद्यालयात अकलूज पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक सौ. स्वाती सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. मानसी देवडीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल फुले सर यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिन स्थापनेचा हेतू, उद्देश व त्याचे महत्व सांगून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा फेटे बांधून प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महिलांच्या गौरवार्थ विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्यवृंदाने ‘कोमल है, कमजोर नहीं तू’ या गौरव गीताचे सादरीकरण केले. गीत गायन संगीत विभागाचे शिक्षक ज्ञानेश्वर शेलार व स्नेहा शिंदे यांनी केले.

याप्रसंगी राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान महिलांचा वेश परिधान करून आलेल्या विशाखा राजभोग, श्रावणी काळे, समीक्षा भोसले या विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयाचे सहशिक्षक एन. एस. बनसोडे सर यांनी महिला दिनाचे महत्व विषद करताना स्त्रीयांनी पुरुषांच्या मर्यादित क्षेत्राची मक्तेदारी मोडून काढून जुन्या-रूढी परंपरांच्या जोखडातून स्वतःला मुक्त होत आधुनिक काळात पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कर्तृत्वाची गगनभरारी घेतली आहे, असे विचार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स. पो. निरीक्षक स्वाती सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तणावमुक्त जीवनाचा आनंद घेत विद्यार्थी दशेत भरपूर ज्ञानार्जन करावे, असा सल्ला दिला. याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मानसी देवडीकर यांनी केवळ शारीरिक सुदृढता म्हणजे निरोगी शरीर नसून त्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक या घटकांचा विकास विद्यार्थी दशेतच करावा. दिवसभरातील चांगल्या वाईट घडामोडींचे आत्मचिंतन करावे तसेच सामाजिक बांधिलकी जपत स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. नकारात्मकतेपासून दूर राहून विविध परीक्षांना सामोरे जावे, असे विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय शिंदे, राजश्री करंडे, पर्यवेक्षक उमेश बोरावके, राजन चिंचकर, प्रमिला राऊत, शिक्षक प्रतिनिधी सुखदेव भोसले, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, बहुसंख्य विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट पवार, राजकुमार पाटील यांनी केले तर आभार सुनीता ठोंबरे मॅडम यांनी मानले. छायाचित्रण सहशिक्षक आनंद शिंदे, अमोल बनपट्टे यांनी केले. या बहारदार कार्यक्रमाचे उत्तम नियोजन विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button