अतिशय प्रतिकूल परिस्थितीला संघर्षमय लढा देऊन यशाच्या दिशेने केलेली वाटचाल खरोखरच प्रेरणादायी – सौ. शशिकला जाधव
शिवनिर्णय संघटना अकलूज व महाराष्ट्र वीरशैव सभा माळशिरस तालुका यांच्यावतीने सौ. शशिकला तुकाराम जाधव यांना जिद्द पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
अकलूज (बारामती झटका)
शिवनिर्णय संघटना अकलूज व महाराष्ट्र वीरशैव सभा माळशिरस तालुका यांच्यावतीने जिद्द पुरस्कार सोहळ्याचे वितरण शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आयुष्याच्या प्रवासात जिद्दीने आणि कष्टाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षमय लढा देऊन यशाच्या दिशेने उत्तुंग भरारी घेणाऱ्या अकलूज पंचक्रोशीतील डॉ. संतोष दोशी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेशजी कोतमिरे, शशिकला जाधव, मुस्तफा कापडिया (भोरी), गिरीजा खोचरे, शिवाजी दोरकर, विठ्ठल खंदारे, डॉ. शिवराज धोत्रे, जावेद तांबोळी या यशस्वी नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिद्द पुरस्कार सोहळ्याच्या मानकरी सौ. शशिकला तुकाराम जाधव यांचा अल्प परिचय पाहूयात. एका सामान्य कुटुंबात शेतकरी आई-वडिलांच्या पोटी दि. १/६/१९५४ ला कोरेगाव येथे सौ. शशिकला जाधव यांचा जन्म झाला. त्यांनी सन १९५९ ते १९७३ पर्यंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कोरगाव येथे पूर्ण केले. सन १९७४ ला सातारा जिल्ह्यातील शिवतर गावातील प्राध्यापक श्री. तुकाराम भिकू जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अपुरे शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीमुळे सन १९८० ला शिवथरसारख्या खेड्यात राहून सातारा येथे जाऊन बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८१ ते १९८२ पर्यंत शिवण कर्तनचा कोर्स त्यांनी पूर्ण केला.
अकलूजच्या पुण्यनगरीत ४ जुलै १९८३ ला सहकार महर्षींच्या स्वप्नपूर्तीसाठी संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पैल उर्फ दादासाहेब यांच्याहस्ते सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळेची फक्त ४ वर्ग व १२० विद्यार्थी असताना मूर्तमेढ रोवण्यात आली, ज्यामध्ये सौ. शशिकला जाधव यांची शिक्षक म्हणून व काही कालावधीनंतर मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली. याच दरम्यान १९८५ ला राज्यामध्ये उच्चाणखी गुण घेऊन त्यांनी डी.एड. पूर्ण केले.
यावेळी बोलताना सौ. शशिकला जाधव बोलताना म्हणाल्या कि, बाळदादा व वहिनीसाहेब यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे, केलेल्या मार्गदर्शनामुळे मी हे करू शकले, हे मी कधीही विसरू शकत नाही. मी माझे सर्वस्व या शाळेसाठी वाहून दिले व ते माझे कुटुंब आहे, असे समजले. याचे फलित म्हणजे आज या वटवृक्षाचे रूपांतर म्हणजे ५००० विद्यार्थी तसेच १०५ शिक्षक व३ शिक्षकेतर कर्मचारी असून यामध्ये मी एकूण ३१ वर्ष सेवाकाळ करू शकले, हे माझे भाग्य समजते. ज्यामध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली अंदाजे १८ ते २० हजार विद्यार्थी ज्ञान घेऊन बाहेर पडले असून उच्चपदी जसे की प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत याचा मला खूप अभिमान आहे.
या खडतर प्रवासामध्ये माझे पती, माझी मुले, माझे सर्व नातेवाईक व काही गुरुजन वर्ग विशेषता स्व. सा. सू. देशमुख सर, सर्व संचालक यांचे फार मोलाचे मार्गदर्शन लाभले, त्यांची मी सदैव ऋणी आहे, आणि राहील.
या कार्याबद्दल मला आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. परंतु, आजचा हा क्षण विशेष आनंदाचा व जीवनात अविस्मरणिय असा आहे कारण हा सन्मान अशा संस्थे चा आहे ज्याचा अध्यक्ष हा माझा एक काळचा विद्यार्थी आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. हा पुरस्कार माझा नसून अकलूज पंचक्रोशीतील सर्वांचा आहे असे मला मनापासून वाटते, असेही सौ शशिकला जाधव म्हणाल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng