अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्यावर गुटखा माफिया म्हणून गुन्हा दाखल, अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
प्रशांत कुचेकर यांच्या चेहऱ्याआड लपलेले अनेक चेहरे समोर येणार…
कवठेमहांकाळ (बारामती झटका)
कवठेमहांकाळ पोलिसांनी रविवारी रात्री नागज फाटा येथे गुटख्याच्या पोत्यांनी भरलेले दोन ट्रक पकडून १ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोलापूर येथे कार्यरत असलेले अन्न व औषध सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्यासह अन्य ७ जणांवर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहणारे प्रशांत कुचेकर हे चक्क गुटखा माफियाच्या भूमिकेत दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कवठे महाकांळ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून नोकरी करत असलेले दीपक प्रकाश गायकवाड यांनी याबाबत गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी पोलीस हवालदार दीपक गायकवाड यांच्यासह पोलिस हवालदार जितेंद्र जाधव, पोलीस हवालदार संजय पाटील, पोलीस हवालदार नागेश खरात, पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस अंमलदार ऋतुराज होळकर, पोलीस अंमलदार विनायक सुतार यांना बोलवून घेऊन गुटखा व सुगंधित पान सुपारी मसाला कवठे महाकांळ पोलीस ठाणे हद्दीमधून ट्रक क्र. एमएच ०४ ईबी ०४८९ आणि एमएच १२ आरएन ३२०३ मधून जाणार आहे, अशी खास बातमीदारामार्फत बातमी कळाल्याचे सांगितले, त्यानंतर संपूर्ण पोलीस पथकाने सापळा लावून ते दोन ट्रक पकडून १ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ट्रक चालक तिपुराया बमनोळी, बसवेश्वर कटीमनी, श्रीशैल हाळके यांच्याकडे याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर अन्नसुरक्षा रक्षक प्रशांत कुचेकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांची पंकज दत्तात्रय तुरेकर रा. हडपसर, पुणे, दर्शन उर्फ मंन्टी दत्तात्रय तुरेकर रा. हडपसर, पुणे, रोहित पटाले रा. इंदापूर, जि. पुणे अशी नावे सांगून हा माळ त्यांचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही ट्रकचे चालक, ट्रक व त्यामधील गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शहाणे हे करीत आहेत. यामध्ये आरोपी प्रशांत कुचेकर यांच्यावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकाराने सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर शहरात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या प्रशांत कुचेकर यांचे दुसरे रूप पुन्हा जगासमोर आले आहे. त्यांनी या अगोदर पंढरपूर तालुका अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहिले होते. अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून काम करत असताना, गुटखा माफियांना पकडणे, त्यांचा माल हस्तगत करणे अशा अनेक कारवाया त्यांनी पार पडल्या आहेत. परंतु जप्त केलेला गुटखा पुन्हा मार्केटमध्ये पाठवून लाखो रुपयांची कमाई करण्याचा त्यांचा मानस या प्रकरणातून पुढे आला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत इतर चार साथीदारांचाही समावेश असून त्यांच्यावर भादवी ३२८, १८८, २७३ तसेच अन्नसुरक्षा मानके अधिनियम २००७ अन्वये ५९ नुसार कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूरचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत शशिकांत कुचेकर यांना गुटखा माफियाच्या रूपात कवठेमंकाळ पोलिसांनी पकडल्यामुळे, प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळला आहे. प्रशांत कुचेकर यांनी यापूर्वी किती लाखांचा गुटखा विकला ? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ? हे तपासल्यास, त्यांचे खरे रूप समोर येणार आहे.
कवठेमंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही व्यापाऱ्यांकडे अवैध गुटख्याचा साठा सापडला आहे. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हा गुटखा अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर आणि त्यांच्या साथीदारांकडून घेतला असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शहाणे यांनी दिली आहे.
ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गुटख्यांवर कारवाई करण्यात येते, त्याच विभागाच्या अधिकाऱ्यावर गुटखा माफिया म्हणून कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng