आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार तात्काळ मागे घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून विरोध करेल – सचिन जगताप
कुर्डूवाडी (बारामती झटका)
महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणारा “महाराष्ट्र भूषण” हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच कोकणातील आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सरकारने बहाल केला आहे. १९९६ पासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. परंतु या पुरस्काराच्या विजेत्यांचे बारकाईने निरीक्षण आणि परीक्षण केले असता यातील बहुतांश विजेते हे एकाच विशिष्ट समाजाचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, अर्थात हे ठरवून केले जाते. सरकारने जातीवादी मानसिकतेतून ब्राह्मणी व्यवस्थेचे लांगुलचालन करण्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. याला सर्वच सरकारे जबाबदार आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आप्पासाहेब धर्माधिकारींना दिलेल्या पुरस्काराचा जाहीर निषेध करत आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कोणतेही फार मोठे सामाजिक कार्य नाही. तसेच महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे नाव सुद्धा ठाऊक नाही. ते कोकण परिसरात रामदासी बैठका भरवून लोकांच्या डोक्यामध्ये जातीयता, खोटा इतिहास आणि अंधश्रद्धा व धार्मीक गुलामगिरी पसरवण्याचे काम करतात. नाना धर्माधिकारी व त्यांचा मुलगा अप्पा धर्माधिकारी यांनी रामदासी बैठकांच्या माध्यमातून समाजामध्ये जातवादाचे, विषमतेचे विष कालवले आहे. या बैठकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली जाते. बैठकीत येणाऱ्या बहुजन समाजातील लोकांना मानसिक गुलाम बनवले जाते. यातून स्त्रिया व मुले या षडयंत्राला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. समाजसेवेच्या नावाखाली रामदासी वर्णव्यवस्था व ब्राह्मणी विषमता बहुजनांच्या डोक्यात लादण्याचे हे कारस्थान आहे. असंख्य बहुजन कुटुंब यामुळे बरबाद झाली असून शिक्षण, रोजगार सोडून अंधश्रद्धेच्या मार्गी लागलेली आहेत. रामदासी बैठकांच्या नावावर अनेक ठिकाणी खूप वाईट प्रकार सुरू आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे कोणत्याही प्रकारे गुरु शिष्याचे नाते नव्हते, हे उच्च न्यायालयाने सुद्धा सिद्ध केलेले आहे. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा रामदास स्वामींचे उदातीकरण करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी रामदासी बैठका घेत असतात. प्रत्येक घरामध्ये दासबोधाचे व रामदासी देव्हारे, रामदासी पट्ट्या यांचे वाटप केले जाते. यातून खूप मोठा आर्थिक व्यवहार होतो. रात्रंदिवस मुलांना, महिलांना व कुटुंबातील व्यक्तींना दासबोधाच्या पारायणामध्ये गुंतवून ठेवले जाते, त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास खुंटतो. अशा व्यक्तीला खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या खाली अटक व्हायला हवी. परंतु, सरकार त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही हे होऊ देणार नाही. सर्व बहुजनवादी संघटनांनी व कार्यकर्त्यांनी या विरोधात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. तत्काळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना घोषित झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्यात यावा, हा सरकारला इशारा आहे. अशा आशयाचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी कुर्डूवाडी ज्योती कदम मॅडम यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे.
याप्रसंगी दिनेश जगदाळे राज्य कार्य. सदस्य, सचिन जगताप जिल्हाध्यक्ष, सुहास टोणपे मा.जि.सचिव, सचिन पराडे ता. उपाध्यक्ष माळशिरस, अभयसिंह पाटील गटप्रमुख पिंपळनेर, किरण जाधव ता. उपाध्यक्ष वि.आ, श्रीकांत पाटील अध्यक्ष मावळा ग्रुप, गुलाब पाटील, विजय काळे सदस्य मसेसं, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng