आमदार निवास भूमिपूजन सोहळ्यानंतर अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या या प्रकारानंतर चर्चेला उधाण
मुंबई (बारामती झटका)
नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजन प्रसंगी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणांमुळे उपस्थित नव्हते. तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बसण्यास सांगितले. त्याआधी स्वतः नार्वेकरांनीच खुर्चीवरील ‘मुख्यमंत्री’ असे लिहिलेले स्टिकर काढले. मात्र, यामुळे समर्थकांनी पुन्हा अजितदादा मुख्यमंत्री होणार, असे दावे सुरु केले आहेत.
आम्ही तिघे आहे त्या पदावर राहणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १० ऑगस्टपर्यंत नेतृत्वात बदल होणार, असे भाकीत वर्तवले आहे. त्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी, ‘आजच्या मंगलमयदिनी निरर्थक चर्चेला सुरुवात करू नका. मुख्यमंत्री व्यक्तिगत अडचणीमुळे येऊ शकले नाहीत, असे सांगितले. पण त्याने कोणाचेही समाधान झाले नाही. अखेर, आम्ही तिघेही आहे त्याच पदावर राहणार, त्यात बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांना द्यावे लागले.
मंचावर नेमके काय झाले ?
नार्वेकर, नीलम गोऱ्हे, देवेंद्र फडणवीस त्यांच्या आसनांवर बसले होते. मग अजितदादा मंचावर आले. त्यांची खुर्ची चंद्रकांत दादा आणि गोरे यांच्यामध्ये होती. दादा त्या खुर्चीवर बसले. शिंदे यांची खुर्ची रिकामीच होती. मुख्यमंत्री येणार नसल्याने नार्वेकरांनी अजितदादांना शिंदे यांच्या खुर्चीत बसण्याचे निमंत्रण दिले. खुर्चीवर ‘मुख्यमंत्री’ असे स्टिकर लावले आहे, असे लक्षात आल्यावर नार्वेकरांनी काढले व अजितदादा त्या खुर्चीवर बसले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng