कोविड मंदीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गरोदर महिलांसाठी ठरतेय नवसंजीवनी…
माळशिरस पंचायत समितीचा आरोग्य विभाग लाभ देण्यात जिल्ह्यात अग्रेसर.
माळशिरस (बारामती झटका)
कोविड परिस्थितीमध्ये आरोग्य विभाग फक्त कोविड विषयक सेवा पुरवते असा अनेकांचा समज झाला आहे. परंतु, आरोग्य विभागापुढे कोविड व्यतिरिक्तही सहा राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, सर्व इतर नियमित कामकाज करणे याचे मोठे आव्हान असते. या सर्व गोष्टी करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. अशाच एक गरोदर माताशी निगडीत असलेला कार्यक्रम म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.
माळशिरस तालुका पंचायत समितीचा आरोग्य विभाग शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत लाभ देण्यामध्ये अग्रेसर आहे. माळशिरस तालुक्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी यांचा प्रथम क्रमांक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे व सर्व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.
ही योजना सन 2017 पासून सुरू झाली. ही योजना सुरू झाल्यापासून माळशिरस आरोग्य विभागाने महिलांची ऑनलाइन नोंदणी करून या सर्व महिलांना 6 कोटी 15 लाख 58 हजार रूपये एवढ्या अनुदानाचे वाटप शासनामार्फत ऑनलाइन पद्धतीने केलेले आहे.
या योजनेविषयी माहिती देताना माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी सांगितले की, ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, तालुक्यातील सर्व पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या सहकार्याने राबविली गेली आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका या विशेष प्रयत्न करत आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या गरोदरपणात नोकरी असणाऱ्या महिला सोडून सर्व महिलांना एकूण पाच हजार रुपयाची तीन टप्प्यांमध्ये वाटप ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर करण्यात येते. यासाठी फक्त आधार कार्ड आणि बँक अकाउंटच्या पासबुकची झेरॉक्स लागते. महिला कुठल्याही प्रवर्गातील असेल तरी हा लाभ घेता येतो. हा लाभ देताना नोंदणीच्या वेळेस एक हजार रुपये, गरोदरपणाच्या तीन तपासणी झाल्यावर दोन हजार रुपये आणि बाळाचे लसीकरण झाल्यानंतर दोन हजार रुपये असे तीन टप्प्यात एकूण पाच हजार रुपये मिळतात. यासाठी फक्त बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स आपण गावातील आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा केल्यास आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng