खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यातून एकाच कुटुंबातील चौघांची निर्दोष मुक्तता; माळशिरस न्यायालयाचा निकाल.
माळशिरस (बारामती झटका )
खोट्या विनयभंगाच्या खटल्यातून माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हटकर व कुटुंबातील अन्य तिघांची माळशिरस न्यायालयाचे न्या. निहारकर यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली.
खुडुस (ता. माळशिरस) येथे शेतजमीन संबंधीताच्या वादातून हा प्रकार घडला होता. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरुन माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हटकर आणि कुटुंबातील इतर तिघांविरोधात माळशिरस पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुरावा सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश
हा खटला माळशिरस न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. तत्कालीन तपास अधिकारी यांची साक्ष यात नोंदवली होती. पुरेसा पुरावा सरकारी पक्ष न्यायालयात सिद्ध करु शकले नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकीलांनी केला.
आरोपींची सामाजिक मानहानी करून आर्थिक पिळवणूक करण्यासाठी फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याचे ॲड. आप्पासाहेब वाघमोडे आणि ॲड. पृथ्वीराज कोल्हटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच आरोपीला या खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा केलेला युक्तिवाद, त्याबाबत सादर केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करून न्या. निहारकर यांनी आरोपी माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हटकर व त्याचे बंधू नामदेव कोल्हटकर, तुकाराम कोल्हटकर आणि मुलगा सुशील कोल्हटकर यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
यावेळी सदर आरोपी तर्फे मुबंई उच्च न्यायालयाचे ॲड. जगदिश शिंगाडे, ॲड. कन्हैय्या सोनवलकर यांनी कामकाज पाहिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng