गिरवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
गिरवीचे सरपंच, उपसरपंच, उद्योजक आणि ग्रामस्थ यांनी स्तुत्य उपक्रम राबविला
गिरवी (बारामती झटका)
गिरवी ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १३ ऑगस्ट ते दि. १५ ऑगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रभाग फेरी, सायकल रॅली, पथनाट्य, स्वातंत्र्याचा रिंगण सोहळा, देशभक्तीपर आधारित पाळणागीत, शाळा व गावातील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत गायन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर आजी-माजी सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजी-माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या सायकल बँक उपक्रमासाठी गावच्या सरपंच सोनाली सोमनाथ मदने, उपसरपंच राजू नारायण नरूटे, पुणे येथील उद्योजक रामचंद्र थोरात, माजी सैनिक सुखदेव गेजगे, मेजर विकास जाधव, माजी मुख्याध्यापक गेना सावंत आणि गिरवी स्पोर्ट्स क्लब गिरवी त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांमार्फत शाळेपासून लांब अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ सायकली देण्यात आल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवंत नरूटे व समितीचे सदस्य सत्यवान सावंत यांनी शाळेतील सर्व मुलांना स्नेहभोजन दिले.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक महादेव ढोबळे, शिक्षक चांगदेव पवार सर, कांचन ओव्हाळ, माधुरी कुलकर्णी तसेच गावातील नागरिक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत गायकवाड यांनी केले तर, आभार प्रकाश खुरंगळे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
