Uncategorizedताज्या बातम्या

जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन, माहेरा आपुलिया… आषाढी एकादशी निमित्ताने

नातेपुते (बारामती झटका)

पंढरीची पायी वारी महाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व आहे. एक आहे शयनी एकादशी तर दुसरी आहे प्रबोधिनी एकादशी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वै. ह. भ. प. मनोहर महाराज भगत यांच्या नातेपुते परिसर दिंडीचे प्रमुख ह. भ. प. श्रीराम महाराज भगत, नातेपुते यांनी पत्रकारांशी बोलताना वारीमध्ये संवाद साधला. नववधूला ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला माहेरचा ओढा लागतो, त्याप्रमाणे वारकरी भाविकांना पंढरीची ओढ लागते.

‘भेटी लागी जीवा लागलीसे आस ! पंढरीये माझे माहेर साजणी !’, माझे माहेर पंढरी ! आहे भिवरेच्या तीरी’ तसेच ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता…’ नववधूला ज्याप्रमाणे आपल्या माहेरच्या आई-वडील, भाऊ, बहिणीची आठवण होते, त्याचप्रमाणे वारकरी भाविकांना आपल्या पांडुरंगाची आठवण होते. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधीले, व मी केव्हा पंढरीला जाईल, अशी तळमळ वाटते. पंढरीच्या वाटे वारकरी हुरूहुरू पाहे ! त्यांचे माहेर, पांडुरंग माझा पिता, रुक्मिणी माझी माता, चंद्रभागा माझी बहीण, पुंडलिक माझा बंधू यांना कधी भेटेन, उंदड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ! ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ! अशी मनात प्रेमाची सदिच्छा असते. सासरी बंधने, माहेरी मुक्तता, सासरी दु:ख तर माहेरी सुख असते. सासरी काम असते तर माहेरी आराम असतो. कन्या सासुऱ्याशी जाये। मागे परतोनि पाहे ! तैसे जाले माझ्या जीवा । केव्हा भेटसी केशवा ! वारी हा नुसता प्रवास नसून दैनंदिन जीवनात केलेला बदल आहे. तेच ते विचार, आचार, व्यापार करण्यापेक्षा वेगळी व आनंददायी यात्रा म्हणजे वारी होय. आनंदाने आनंदासाठीच चालायचे, इतरांचे विचार व अनुभव समजून घेणे, सुख-दु:खाची देवाण-घेवाण करणे, शारीरिक व्यायाम, नवदृष्टी, नवीन मित्रमंडळी, अनेक विषयांचे चर्चासत्र म्हणजे वारी. प्रेमाची मात, देवाची साथ, सेवेचा हात म्हणजे वारी होय. वारी ही शरीरासाठी दवा, मनासाठी दावा, बुद्धीसाठी दुवा हीच पंढरीच्या वारीची हवा या वारीत आपला अहंकार गळून पडतो. मोठेपणा पदप्रतिष्ठा विसरणे म्हणजे पंढरीची वारी होय. प्रतिष्ठित, धनवान, जगमान्य लोक हे लोकमान्य होतात, देवमान्य होतात व आपलं मोठेपण विसरून गळ्यात टाळ घेऊन विठू माऊलीच्या हरिनामात दंग होतात. ‘विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल मुकी उच्चारा’, हे वारीचं वैभव व मोठेपणा आहे. सामाजिक सहजीवनाची हाक निर्माण होणं वारी आहे. कपाळी गंध, मनाला नामाचा छंद, हृदयामध्ये गोविंद ही वारीची अंतरंग साधना आहे व गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये टाळ एकादशीला करतो फराळ, जो प्रपंच विसरतो, तो खरा वारकरी होय. ‘सुखरुप ऐसा दुजें, कोण सांगा माझ्या पांडुरंगा’ सारिखेंते एकनिष्ठ असणे’, हेच त्यांचे ज्ञान सुख आहे. शब्दांच्या रूपानं हे संतच पिढ्या-पिढ्यांचे सांगाती झाले आहेत. अटळ कृतज्ञता व चराचरांतील श्‍वास, निःश्‍वासाचं कारण केवळ विठू माउली आहे, ही अढळश्रद्धा. या श्रद्धेतच युगायुगांना ओलांडून पाझरणाऱ्या अमृतानुभवाचं रहस्य दडलं आहे. असे लक्षावधी श्रद्धामेघ टाळ-मृदंगांच्या गजरात नाचत-गात पंढरीकडे निघण्याचा हा भक्तिऋतू. चंद्रभागा होऊन, वाळवंटाचीही मखमली हिरवळ जगण्याचा हा दिंडीक्षण. आषाढी सोहळ्याला आपल्या नादमयी व चित्रमयी दृष्टीनं संतमहात्मे शब्दबद्ध करतात, तेव्हा अवघे पंढरपूर समोर उभं ठाकते. आषाढीचा हा भक्तीचा महोत्सव हाच एक आपल्या जीवनातील अजअमर महामहोत्सव आहे. आषाढी सोहळ्यासाठी दाटून आलेली वैष्णवांची मांदियाळी तर आहेच

‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे।’, भक्ती, श्रद्धा आणि आस्था, निश्चय या मानवी भावनांचा सामूहिक आविष्कार म्हणजे वारी. माणसाचे माणसाशी असलेले रक्ताच्या पलीकडचे नाते इथे कळते. समाजामध्ये असणाऱ्या सुप्त शक्तीचे दर्शन इथे घडते. म्हणून वारी ही केवळ एक परंपरा न वाटता ती एक आनंद यात्रा वाटते. परब्रह्माला साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी. मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी. संतांना आपले विचार केवळ ग्रंथांत ठेवायचे नव्हते, तर लोकमाणसाच्या भावविश्वात ते ठसवायचे होते. म्हणून वारीमध्ये वाटचाल आहे, पाऊल आहे, गिरकी आहे, रिंगण आहे, हरिपाठ अभंग आहे, हरिनाम भारूड आहे, नामगजर आहे, कीर्तन आहे आणि या साऱ्यातून उभे राहिलेली आनंद चैतन्य वारी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort