तुपामधील भात खाल्ल्यास साखर वाढणार नाही
मधुमेही रुग्णांना दिलासा; डॉ. स्वाती खारतोडे यांच्या संशोधनातून आले समोर
पुणे (बारामती झटका)
मधुमेह रुग्णांना नेहमीच भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, भात कुकरमध्ये न शिजवता तो तुपामध्ये दोन ते तीन मिनिटे परतून पातेल्यामध्ये शिजवलेला भात खाल्ला तर रक्तातील साखर वाढत नसल्याचे डॉ. स्वाती खारतोडे यांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. दरम्यान या संशोधनाची जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी अँड थेरपेटीक्सनेही नोंद घेतली आहे.
मधुमेह असणाऱ्या सर्वच रुग्णांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण, भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची भीती असते आणि काही प्रमाणात ते खरेही आहे. किंवा ब्राऊन राईस खाण्यास सांगितला जातो. परंतु, ब्राऊन राईस पचायला खूप जड असतो. पोटात गॅसेस होण्याचा त्रास होऊ शकतो आणि चवीलाही चांगला नसतो. मात्र, डॉ. स्वाती खारतोडे यांनी केलेल्या संशोधनातून जर भात कुकरमध्ये न शिजवता तो तुपामध्ये दोन ते तीन मिनिटे परतून पातेल्यामध्ये शिजवला तर असा भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखर अजिबात वाढत नसल्याचे समोर आले आहे.
पुणे येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये मागील वर्षभर यावर संशोधन सुरू होते. त्यासाठी १०३ मधुमेह असलेल्या रुग्णांना कुकरमध्ये न शिजवता तुपामध्ये दोन ते तीन मिनिटे परतून पातेल्यामध्ये शिजवलेला भात खाण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी या रुग्णांची एचबीएवनसी ही रक्ताची तपासणी केली. या तपासणीमुळे मागील तीन महिन्यांची साखरेची सरासरी पातळी किती आहे, हे कळते. तीन ते चार महिने या पद्धतीने भात खाल्ल्यानंतर पुन्हा एचबीएवनसी ही रक्तातील तपासणी केली असता त्यामध्ये ८६ टक्के मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले.
संशोधनांमध्ये डॉ. स्वाती खारतोडे यांना विश्वराज मधील तज्ञ डॉ. सुशांत शिंदे, डॉ. नामदेव जगताप, डॉ. तरबेत पठाण, डॉ. अनिरुद्ध गरुड, किरण पंडित, बालाजी केंद्रे यांची मदत झाली.
मधुमेह रुग्णांनी अशा पद्धतीने भात शिजवून खाल्ल्यास त्यांची रक्तातील साखर वाढणार नाही. हे संशोधन असा भात खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होत असल्याचा अजिबात दावा करत नाही. – डॉ. स्वाती खारतोडे, मुख्य आहार तज्ञ आणि संशोधक
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng