निरंकारी मिशनच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ५४ जोडपी विवाहबद्ध
महाराष्ट्रातील ४ जोडप्यांचाही समावेश
बारामती (बारामती झटका)
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा समाज कल्याण विभागाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याचे गुरुवारी (ता.२४) सकाळी ११ वाजता आयोजन केले होते.
सदर विवाह सोहळ्याचे आयोजन संत निरंकारी अध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे केले होते. ज्यामध्ये एकूण ५४ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार जोडप्यांचा समावेश होता. या विवाह सोहळ्यास वधू-वरांचे आईवडील, नातेवाईक तसेच बारामतीसह राज्यातील हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.


याप्रसंगी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दाम्पत्यांना आपले पावन आशीर्वाद प्रदान केले, तसेच त्यांच्या सुखी जीवनासाठी मंगलमय प्रार्थना केली.
संत निरंकारी मिशनचे तृतीय गुरू बाबा गुरुबचनसिंहजी यांनी समाज कल्याण व सामाजिक सुधारणांच्या अंतर्गत साधे विवाह करण्यावर विशेष भर दिला. दिखाऊपणाच्या अवडंबरापायी वायफळ खर्च करण्यात संकोच केला जावा, हाच त्यांचा उद्देश होता. त्यांच्या याच लोककल्याणकारी भावना पुढे घेऊन जाण्यासाठी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सर्व भक्तगणांना मार्गदर्शन करीत आहेत.
आजच्या या शुभ प्रसंगी भारताच्या विविध राज्यांतील प्रामुख्याने आसाम, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तराखंड व पश्चिम बंगाल येथील जोडप्यांचा समावेश आहे. सामूहिक विवाहानंतर सर्वांसाठी भोजनाची योग्य व्यवस्था निरंकारी मिशन द्वारे केली होती.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
