Uncategorizedताज्या बातम्या

परळी येथील वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटीचा छापा

कागदपत्रांची केली तपासणी, सहकार क्षेत्रात खळबळ

परळी वैजनाथ (बारामती झटका)

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी जीएसटी विभागाने छापा टाकला‌. कारखान्याच्या जुन्या व्यवहारांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मुंडे यांच्या कारखान्यावर धाड टाकल्याने सहकार आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

जीएसटी विभागाचे पथक सकाळी पांगरी येथील कार्यालयात तपासणीसाठी धडकले. कारखाना जानेवारी महिन्यापासून बंद असल्याने कार्यालयास कुलूप होते. तीन गाड्यांमधून तब्बल १० अधिकारी सकाळी कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सकाळी कार्यालय उघडायला लावले. कर्जामुळे कारखाना जानेवारीपासून बंद ठेवण्यात आला आहे. सध्या सुरक्षा कर्मचारी वगळता कारखान्यात कुठल्याच विभागाचे कर्मचारी कार्यरत नाहीत. जीएसटी अधिकारी यांनी वैद्यनाथ कारखान्याच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली आहे‌. या कारखान्याने १२ कोटींचा जीएसटी थकवल्याचे समजते.

या छाप्याची माहिती पंकजा मुंडे यांनाही नव्हती‌. त्या एका कार्यक्रमात असताना त्यांना ही बातमी कळाली‌. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने केंद्र सरकारकडून मदतीकरिता आम्ही काही कारखानदारांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. त्यामध्ये आर्थिक अडचणीतील कारखान्यांना मदत देण्याची मागणी केली होती. वैद्यनाथ कारखाना गेल्या सहा सात वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. जीएसटी व कर्जाची रक्कम थकीत आहे. २०० कोटींचे कर्ज आम्ही आतापर्यंत परतफेड केलेले आहे. जीएसटीचे काही अधिकारी सकाळी कारखाना कार्यालयात आले होते त्यांना हवे असलेली कागदपत्रे दिली आहेत, असेही त्या म्हणाल्या.

अचानक विषय कसा आला ?

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना तेव्हा राजकारणामुळे कर्ज मिळाले नव्हते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांकडून अधिकच्या व्याजाचे कर्ज घ्यावे लागले‌. सुरू असलेली तपासणी नेमकी कसली आहे, हे माहिती नाही. जीएसटीच्या पैशांचा आमचा अंतर्गत वाद होता‌. तो पैसा आम्ही काही दिवसात भरणारच होतो‌‌. पण या गोष्टी मला अशा प्रकारे उघड कराव्या लागतील, याची कल्पना नव्हती‌. विशेष म्हणजे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी वरून आदेश आल्याचे सांगितल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले‌‌. अधिकाऱ्यांशी मी बोलले. अचानक हा विषय काय आहे, हेही विचारले…, असेही त्या म्हणाल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button