पाणीपुरवठा टेंडर प्रक्रियेत अनियमितता, कार्यकारी अभियंता कोळी यांच्यावर काय कारवाई होणार ?
सोलापूर (बारामती झटका)
शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने सप्टेंबरमध्ये ९० कोटीच्या जाहीर निविदा प्रक्रिया राबविली होती. सदर निविदा पारदर्शक पद्धतीने न होता, सदर ९० कोटींपैकी ३ कंत्राटदारांना ५४ कोटींची कामे संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी मॅनेज करून दिल्याचा आरोप लोकप्रतिनिधी यांनी केला होता.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, यात कार्यकारी अभियंता दीपक कोळी हे दोषी आढळल्याचे नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोळी यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार, या संदर्भात सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
कार्यकारी अभियंता कोळी हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाईचा शिफारशीसह अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात कारवाईचा अहवाल राज्य शासनाकडे केंव्हा पाठविण्यात येणार ? त्यावर राज्य शासन काय निर्णय घेणार ? हा प्रश्न सध्या गुलदस्त्यात आहे. कोळी यांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटनेने आक्षेप नोंदविला होता. आ. सुभाष देशमुख, आ. यशवंत माने यांनी नियोजनाच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवून जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंता यांची समिती नेमण्याचे आदेश दिले होते. सदर समितीला अहवाल प्राप्त झाला आहे. यात कोळी दोषी आढळले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng