पुरंदावडे ग्रामस्थांनी श्री महालक्ष्मी देवीच्या परिसराचे पावित्र्य जपणे गरजेचे
पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गटारीचे घाण पाणी व सांड पाण्याची भाविकांना दुर्गंधी येते
पुरंदावडे ( बारामती झटका )
पुरंदावडे ता. माळशिरस येथील भाविकांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरात स्थानिक नागरिकांनी पावित्र्य जपणे गरजेचे आहे. पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या या ढिसाळ कारभाराचे प्रदर्शन पहावयास मिळत आहे. देवीच्या कंपाउंड शेजारी सांडपाणी व घाण पाण्याची गटार गेलेली आहे. सदरची गटार फुटून घाण पाणी देवीच्या मंदिराशेजारील खंडोबा मंदिराच्या समोर साठलेले असल्याने दुर्गंधी पसरून डासांचे साम्राज्य निर्माण झालेली आहे.
श्री महालक्ष्मी देवी पुरंदावडे ग्रामस्थ आसपासच्या गावातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. सदर मंदिरास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दोन कोटी रुपये मंजूर केलेले आहे. मंदिर परिसर विकास होणार आहे. सदर मंदिराच्या आजूबाजूला कंपाऊंडच्या आत स्थानिक नागरिकांनी जनावरे, कचरा आणि घाण केलेली असल्याने मंदिरातील देवीचे पावित्र्य राहत नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने यात्रा, जत्रा, सण, उत्सव यावर बंदी घातलेली होती. यंदाच्या वर्षी कोरोना संसर्ग रोग नसल्याने सर्वत्र जत्रा, यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत.
शारदीय नवरात्र उत्सवामध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या गटारीचे घाण पाणी मंदिर परिसरात गेलेले असल्याने दुर्गंधी सुटलेली आहे. स्थानिक नागरिक यांनी पावित्र्य जपण्याकरता देवीच्या आसपास पाळीव जनावरे, घाण करू नये.
थोड्या दिवसांमध्ये दोन कोटी रुपयांच्या विकासकामांची सुरुवात होणार आहे. परिसरामधील छोटे-मोठे कार्यक्रम श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरात होणार आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी स्वतःहून देवी परिसरात आपला उपद्रव होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
पुरंदावडे पंचक्रोशीतील नागरीक आपल्या घरातील वृद्ध व आजारी असणाऱ्या लोकांना मंदिरामध्ये सोडून जात आहेत. त्यामुळे सदरच्या व्यक्तींकडूनही मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही. सर्वांनी श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरात पावित्र्य राखण्याची गरज असल्याचे महिला भाविकभक्तांकडून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng