मविआच्या माध्यमातून सुरू झालेला जलसंपदा विभागातील प्रवास सदैव माझ्या स्मरणात राहील – जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील
मुंबई (बारामती झटका)
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मला जलसंपदा विभागाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू झालेल्या जलसंपदा विभागातील प्रवासाला आता पूर्णविराम लागला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, या प्रवासात सुरुवातीच्या काळात अप्पर मुख्य सचिव श्री. इकबाल चहल, अप्पर मुख्य सचिव श्री. प्रवीण परदेशी, प्रधान सचिव श्री. लोकेश चंद्रा, श्री. विजय गौतम आणि श्री. भूषण गगराणी यांची मोलाची साथ मिळाली. अभियांत्रिकी सेवेतील सचिव श्री. पवार, श्री. घाणेकर, श्री. टी. एन. मुंडे, श्री. कोहीरकर, श्री. स्वामी, श्री. विलास रजपूत आणि श्री. कुलकर्णी यांनी मोठे सहकार्य केले.

विविध पाटबंधारे महामंडळाचे तत्कालीन व कार्यरत कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच जलसंपदा विभागातील सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, इतर अधिकारी, कर्मचारी, तसेच माझ्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्याचा ध्यास आम्ही घेतला होता. मराठवाड्यातील दुष्काळ कायम नष्ट करण्यासाठी वळण योजनांतर्गत उपसा सिंचन योजना क्र. १,२,३ या प्रकल्पांना चांगली गती दिली. यासारखे अनेक प्रकल्प मार्गे लावले. सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ योजनेला चालना देऊन जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामध्ये काही प्रमाणात यश प्राप्तही झाले. यामुळे स्व. राजारामबापू पाटील यांच्या स्वप्नांना वाट मिळाली, याचे समाधान आहे.

आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा व महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचा आम्ही जो कसोशीने प्रयत्न केला त्याची नक्कीच महाराष्ट्र नोंद घेईल, याचा मला विश्वास आहे. मला अपेक्षा आहे की, येणारे नवे सरकार आमच्या कामाची दखल घेऊन या कामांना गती देईल. हा कार्यकाल सदैव माझ्या स्मरणात राहील असा झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
