मैसूर येथे डॉ. योगेशदत्त जाधव यांनी रेशीम शेतकऱ्यांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचा CSR & TI प्रकाशन सोहळा संपन्न
मैसूर (बारामती झटका)
रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथे डॉ. योगेशदत्त तुकाराम जाधव हे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून मागील १२ वर्ष ते रेशीम शास्त्राच्या प्रशिक्षण व संशोधन कार्याशी संबंधित आहेत. जसे दिवस पुढे जात गेले तसे त्यांची त्या शास्त्राबद्दलची ओढ वाढत गेली. त्यामुळे या रेशीम उद्योगाशी संबंधित विविध तज्ञांशी, प्रगतीशील रेशीम शेतकऱ्यांशी, उद्योगात नवीन येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांशी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होऊ लागल्या. त्यातून एक गोष्ट कळाली की जर आपल्या शेतकरीबांधवांनी आपली पारंपारिक शेती करण्याची पद्धत बदलली व एकात्मिक शेती पद्धतीचा विचार केला तर ते सहजरीत्या त्यांच्या मनात येत असलेल्या कमकुवत व हिन विचारांमुळे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेतून दूर होऊन आकाशात पूर्वीसारखी उंच भरारी घेण्याचे स्वप्न पाहू शकतील असा त्यांचा दृढ विश्वास आहे.
आज पाहिले तर जागतिक बाजारपेठेमध्ये रेशीम धाग्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ती पुरवणे सध्यातरी अशक्यप्राय गोष्ट झालेली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांमध्ये रेशीम कोषाचा दर गगनाला भेडसावत आहे आणि याच कारणांमुळे अनेक नवीन शेतकरी ह्या शेतीपूरक व्यवसायात उतरू इच्छित आहेत. परंतु त्यांना प्रादेशिक मराठी भाषेत एकाछत्री माहिती मिळत नसल्यामुळे लेखकाने कोरोना कालावधीतील वेळेचा वापर करून या विषयाबद्दल असलेला अनुभव, केलेले सखोल संशोधन, असलेली संकलित माहिती याचा वापर करून ही शब्दरूपी रेशीम माळ शेतकरी बांधवांसाठी गुंफण्याचे पण केले. या रेशीम उद्योगाचे उभारणीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी लागणारे अति अल्प भांडवल, खाद्यासाठी लागणारी बहुउपयोगी तुतीचे झाड, जे कोणत्याही मातीत, अति अल्प पाण्यामध्ये, कोणत्याही कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी शिवाय, त्याचबरोबर अशिक्षित स्त्रिया सुद्धा सहजरित्या करू शकणारा, राहिलेला तुतीचा पाला घरच्या जनावरांना वापरला जाऊ शकणारा अशा प्रकारे “रेशीम – दुग्ध उद्योग” किंवा “रेशीम – शेळी उद्योग” याचा समतोल राखून शेतकरी बांधव हमखास, कमी कष्टात जास्त मोबदला देणारा शेतीपूरक उद्योगातून आपल्या जीवनात एक आर्थिक क्रांतीचे पर्व उभे करू शकतील असा लेखकाचा ठाम विश्वास आहे.

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा रेशीम शास्त्रामधील भारतामध्ये सर्वोच्च स्थान असलेल्या CSR&TI, मैसूर येथे डॉ मेरी जोसफ ( डायरेक्टर ) यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विभागाचे प्रमुख रिसर्च सायंटिस्ट डॉ. के. बी. चंद्रशेखर, डॉ. भाग्या, डॉ. रघुनाथ आणि डॉ. वाय. एन. सनातनकुमार यांच्या शुभहस्ते आणि रत्नाई कृषी महाविद्यालयाचे चतुर्थ वर्षातील सेरिकल्चर मॉडेलच्या विद्यार्थ्यांसमवेत संपन्न झाला. अशा प्रकारे प्रादेशिक भाषेमध्ये रेशीम शेतकऱ्यांसाठी लिहिले “रेशीमशास्त्र – रेशीम शेती एक हमखास शेतीपूरक व्यवसाय” या पुस्तकास प्रकाशनाचा प्रथमच मान मिळत असून हा त्यांच्यासाठी खूप मोठा बहुमान आहे. त्याचबरोबर ज्यांच्या शाब्बासकीच्या थापेमुळे व विश्वासामुळे हे करू शकलो ते माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे, अध्यक्ष श्री. जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील व संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांना पुस्तकाची प्रथम प्रत देण्यात आली. या रेशीम शेतकऱ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, संचालक, सचिव, सहसचिव, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य व सर्व प्राध्यापक वृंदांनी लेखकाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर लेखकाला या प्रवासादरम्यान सदैव प्रोत्साहन व साथ देणारे त्यांचे वडील श्री. तुकाराम भिकू जाधव, आई शशिकला, पत्नी, मुले आणि सर्व कुटुंबीय यांचा मोलाचा वाटा आहे.
लेखकाच्या मते या पुस्तकामार्फत जर रेशीम शेती करण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणींचे सखोल स्पष्टीकरणामार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले गेले तर तीच त्यांच्या पुस्तकाची खरी पोचपावती असेल. असे ते समजतात आणि त्यासाठी त्यांनी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng