यशवंतनगर येथे पाचशे शाळकरी वारकऱ्यांचा नयनरम्य बालदिंडी पालखी सोहळा…
अकलुज (बारामती झटका)
संस्कारक्षम असलेल्या बालवयातच मुलांना अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी. सांप्रदायाच्या माध्यमातुन मुलांचे भावी आयुष्य आनंदी व्हावे या ऊदात्त हेतुने महर्षि प्रशाला प्राथमिक विभागाच्या वतीने व प्रशाला समिती सभापती स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या नियोजनातुन “ज्ञानोबा तुकारामाच्या” जयघोषात मोठ्या भक्तीभावाने 520 शाळकरी वारकऱ्यांच्या दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी दि. 24 रोजी अकलुज येथे दाखल होत आहे. त्यापुर्वी अकलुज व परिसरात शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज व इतर संस्थांनी आध्यात्मिक उपक्रम राबवुन परिसर भक्तीमय केला आहे.ज्ञत्याचाच एक भाग म्हणुन मुलांना लहान वयातच अध्यात्मातुन परमार्थ साधण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणुन गेल्या 20 वर्षांपासुन महर्षि प्रशालेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांच्या संकल्पनेतुन शाळकरी मुलांच्या बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर शेलार यांच्या हस्ते पालखी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, सहकार महर्षि आणि आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी पारसे, शालेय पोषण आहार व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनाली राजकुमार पाटील, संदिप रेडेकर, शोभा संदिप रेडेकर, पत्रकार शिवाजी पालवे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मधुर आवाजात गायलेल्या “विठ्ठल नामाची शाळा भरली” या अंभंगातुन शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील विठ्ठल असल्याचे पटवुन दिले.
वारकऱ्यांच्या वेशभुषेतील बाल विणेकरी, टाळकरी, तुळस डोक्यावर घेतलेल्या बाल वारकरी मुली आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषाने अवघे यशवंतनगर विठ्ठलमय झाले होते. देवी-देवतांच्या वेशभुषेतील आणि घोड्यावर बसलेले बाल वारकरी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेत होते. महर्षि संकुल येथुन सुरु झालेली ही शाळकरी वारकऱ्यांची बालदिंडी पालखी सोहळा शिवरत्न बंगला-स्वरुपनगर-सुमित्रानगर मार्गे विठ्ठल नामाचा जयघोष आणि पर्यावरण जागृती करीत पुन्हा शाळेत दाखल झाली. बाल वारकऱ्यांच्या दिंडी-पालखी सोहळ्याने संत तुकाराम महाराज पालखी येण्या आगोदर नागरीक भक्तीरसात न्हावुन निघाले. शाळेत परतल्यानंतर देखणा रिंगण सोहळा पार पडला. या अनोख्या बालदिडींमध्ये विसाव्याच्या ठिकाणी प्रशालेतील सौ. गोडसे व लालासाहेब मगर यांनी बाल वारकऱ्यांना डिंकलाडुचे वाटप केले.
रिंगण सोहळ्यानंतर सर्व शाळकरी वारकऱ्यांना संदिप रेडेकर यांनी स्नेहभोजन दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परीश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुषमा काशिद, सुत्रसंचालन रवि गायकवाड तर आभार प्रदर्शन यशवंत दुधाट यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng