Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धगधगता प्रवास…

सांगोला (बारामती झटका)

शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी साडेसात वाजता राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ठाण्यामधील कोपरी पाच पाखाडीचे आमदार एवढीच त्यांची ओळख नसून गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत. शिवसेना शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे सातारा जिल्ह्यातील दरे तांबे गावातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानापर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा ठरला आहे.
आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरू करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे नंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी एकहाती केलं. एका रिक्षाचालकाने आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा जन्म दि. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी दरे तांबे, ता. जावळी, जि. सातारा या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले असून त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा अवगत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी १ लाख २३ हजार ४९५ मते घेऊन भाजपचे उमेदवार संजय घाडीगावकर यांचा ८९ हजार ३०० मतांनी पराभव केला होता.

सुपरवायझर, रिक्षाचालक ते थेट नगरसेवक
सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनीही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटोरिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली त्या व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे‌ वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची काम करताना शिंदेंना आनंद दिघे यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतराने एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. पक्षाप्रतिची निष्ठा पाहून त्यांच्या कामाची पावती मिळालीच. १९८४ साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं‌. इथूनच खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द –
१) १९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक
२) तीन वर्ष स्थायी समिती सदस्य
३) चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे
४) २००४, २००९, २०१४, २०१९ चार वेळा आमदार
५) २०१४ ते २०१९ विधिमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते
६) १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विधानसभा विरोधी पक्षनेता
७) ५ डिसेंबर ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री
८) जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
९) ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड
१०) डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गटनेते
११) नोव्हेंबर २०१९ पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री
१२) ३० जून २०२२ पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button