विकास सोसायट्या व महिला बचत गटांना दूध संस्था सुरू करता येणार – चेअरमन रणजितसिंह शिंदे
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड पाटील यांजकडून
सोलापूर जिल्ह्यातील गावोगावच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्या व महिला बचत गटांनाही यापुढे दूध डेअरी व्यवसाय सुरू करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सोलापूर येथील कार्यालयाशी येत्या चार ते पाच दिवसात संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा दूध उत्पादक व प्रकिया संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.


पुढे अधिक माहिती देताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, शेतीला पूरक असणा-या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाला अधिक गती व बळकटी येण्याच्या उद्देशाने संचालक मंडळाने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये गावोगावच्या विकास सोसायट्या, महिला बचत गट, तरुण शेतकऱ्यांचे समूह शेती गट, सुशिक्षित व बेरोजगार तरुणांचे गट, विविध सामाजिक संस्था यांसह इतर इच्छुकांना जर आपल्या गावामध्ये नव्याने दूध डेअरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची व अटींची पूर्तता केल्यास तातडीने मंजुरी दिली जाणार आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये दूध डेअरी व्यवसाय सुरू होता. परंतु, काही कारणास्तव तो बंद पडला असल्यास अशा संचालक मंडळांनी पुन्हा नव्याने त्या दूध डेअरीचे पुनरुज्जीवन करायचे ठरविल्यास संबंधितांना आवश्यक ती मदत व सहकार्य केले जाईल.
या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम व रोजगार मिळणार आहे. तसेच गावोगावच्या पशुपालकांना व दूध उत्पादकांना चांगली मदत होणार आहे. गावोगावी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या दुध डेअरी नव्याने सुरू झाल्यास “गाव तेथे दुध डेअरी” ही महत्त्वाकांक्षी संकल्पना अंमलात येऊन जिल्हा दूध संघाचे संकलन वाढविण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

