वेळापूर येथे पालखीमार्ग-सर्व्हिस रस्त्यासाठी रास्ता रोको
वेळापूर येथील व्यापारी, गाळेधारकांची उपासमार, विविध विभागांना निवेदन
वेळापूर (बारामती झटका)
सध्या पालखी महामार्गाचे वेळापूर येथील काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबत वेळापूर पालखी महामार्गाच्या उत्तर बाजू कडील असलेला रस्ता संबंधित कंपनीने केला आहे; मात्र दक्षिण बाजूला मोठ्या प्रमाणात व्यापारी असल्याने पालखी महामार्गाच्या दक्षिण बाजूचा मुस्लिम दफनभूमी ते पालखी चौक सर्व्हिस रोड न केल्यामुळे गाळेधारकांची मोठी उपासमार होत आहे.
याबाबत मागील काही दिवसांपासून वेळापूर बस स्थानकाजवळ बोगद्याचे काम चालू आहे. ते काम चालू केल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्ता बंद असल्याने व्यापाऱ्यांकडे ग्राहक येऊ शकत नाही, यामुळे गाळेधारक व्यापाऱ्यांची उपासमार होत आहे. अनेक दिवसांपासून हीच परिस्थिती असल्यामुळे व्यापारी मोठ्या संकटात आहेत.
सर्वात आधी उड्डाणपूल जवळील सर्व्हिस रस्ता पूर्ण करण्याची गरज होती. परंतु, तो पूर्ण करण्यास प्राधान्य दिले नसल्याने संबंधित कंपनीने चुकीच्या धोरणामुळे गाळेधारकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नाकेबंदी झाली असून काही व्यापाऱ्यांनी बँक कर्ज काढून व्यवसायात गुंतवलेले पैसे बँकांना व्याज द्यावे लागत असून या नुकसानीचा मोठा फटका गाळेधारक व व्यापाऱ्यांना बसत आहे. या बाजूच्या सर्व गाळेधारक व जागा मालकांना नुकसान भरपाई देऊन उड्डाणपुलाशेजारील सर्व्हिस रोड तात्काळ संबंधित कंपनीने करून द्यावा; अन्यथा सर्व वेळापूर चौक ते मुस्लिम दफन भूमी लगत असलेले दुकानदार दि. २१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पुणे-पंढरपूर रोड बस स्थानक बोगद्याजवळ रस्ता रोको करणार असल्याचे निवेदन देण्यात आले.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अकलूज, पोलीस उपविभागीय अधिकारी अकलूज, तहसीलदार माळशिरस, नॅशनल हायवे कार्यकारी संचालक पंढरपूर, पोलीस स्टेशन वेळापूर यांना दिले आहे या निवेदनावर रिपाईचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, माजी उपसरपंच नितीन शेठ चौगुले, उद्योगपती अनिल घाडगे, माने देशमुख, अमृतराव शिंदे, नवनाथ शेठ, वाघमारे, इकबाल आतार, अजय शेठ शिंदे, अरुण वाघ, देवा जाधव, जहागीर आतार, फिरोज आतार, असलम बागवान, मनोज आडत, अनिल सागर, प्रल्हाद सागर, बाबा देवकते, दीपक सावंत, अमजद कोरबू या व्यापारी व गाळेधारक यांनी सह्यानिशी निवेदन संबंधित विभागांना दिले आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत; अन्यथा गाळेधारक व व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या गाळेधारक व्यापाऱ्यांनी दिला आहे.
वाहनधारकांची कसरत
वेळापूर जवळ पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी वेळापूर जवळ सर्व्हिस रोड न केल्यामुळे येथील नागरिकांना व दुकानदारांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता न केल्यामुळे नाईलाजास्तव या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसला तरीही जीवघेण्या पद्धतीने जावे लागत आहे याबाबत संबंधित कंपनीने याकडे दुर्लक्ष केले असून, त्वरित यावर तोडगा काढावा, अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng