Uncategorized

शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे येथील विभागीय केंद्राच्या सल्लागार समितीवर नियुक्ती

अकलूज ( बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे येथील विभागीय केंद्राच्या सल्लागार समितीवर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांचे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र पुणे अंतर्गत पुणे, सोलापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातील अभ्यास केंद्राचा समावेश होतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व विभागीय केंद्राचे काम अधिकाधिक गुणवत्ता पूर्ण व सक्षम होण्यासाठी जिल्हा निहाय एका तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. यामध्ये डॉ. आबासाहेब देशमुख यांची सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. आबासाहेब देशमुख यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील 40 वर्षाच्या अनुभवामध्ये प्रतिष्ठान महाविद्यालय, पैठण येथे 1980 ते 1995 या कालावधीत प्राध्यापक म्हणून तर शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे 1995 ते 2021 या कालावधीत प्राचार्य म्हणून काम करताना अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले. त्यांनी 1998 मध्ये 165 विद्यार्थी घेऊन शंकरराव मोहिते महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, नाशिकचे अभ्यास केंद्र सुरू केले. आज या केंद्रात दरवर्षी दीड हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या केंद्रात शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी पी.एस.आय., नायब तहसीलदार, पोलीस, प्राध्यापक, शिक्षक म्हणून विविध ठिकाणी काम करत आहेत. डॉ. आबासाहेब देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार, सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट पुरस्कार, दैनिक लोकमत आदर्श प्राचार्य पुरस्कार तसेच सायन्स ओलंपियाड फाउंडेशन, दिल्लीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार ही त्यांना मिळालेला आहे.

डॉ. देशमुख यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सिनेट, अकॅडमी कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती, परीक्षा मंडळ, स्थायी समिती अशा विविध प्राधिकरणावर सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच दोन वेळा सायन्स विभागाचे अधिष्ठाता व ऍग्रो केमिकल व पेस्ट मॅनेजमेंट विषयाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या सेवा कालावधीत शंकरराव मोहिते महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार दोन वेळा तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारही मिळाला आहे.

सध्या ते सोलापूर विद्यापीठ प्राचार्य फोरमचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केलेली असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यास व्हावा या हेतूने डॉ. देशमुख यांची सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून विभागीय केंद्र, पुणे सल्लागार समितीवर तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button