शासकीय सवलतींसाठी कोणी बनले बहिरे तर कोणी आंधळे
जिल्हा परिषद – ७८ गुरुजींच्या निलंबनानंतर आता नंबर कोणाचा ?
बीड (बारामती झटका)
बीड जिल्ह्यात दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या ७८ शिक्षकांना निलंबित केले आहे. शासकीय सवलतींसाठी कोणी बहिरे, तर कोणी आंधळे बनले आहेत. काहींनी मेंदू आजाराचा मार्ग शोधला आहे. 23 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई अटळ मानली जात आहे. शिक्षण विभागाप्रमाणे अन्य विभागातही बोगसगिरी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे जिल्हा परिषदेसमोर आव्हान आहे. बदलीसाठी अर्ज केलेल्या संवर्ग १ मधील शिक्षकांची १४ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यानंतर २५६ शिक्षकांच्या पुनर्तपासणीचे निर्देश दिले होते. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील अपंग मंडळांनी केलेल्या या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर संबंधित ७८ शिक्षकांना जिल्हा परिषद सेवेतून तात्पुरते दूर करून आणि निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश सीईओंनी दिले.
बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार
सध्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. दुर्धर आजार, विधवा, घटस्फोटीत, स्वातंत्र्यसैनिकांची पत्नी या घटकातून प्राथमिक शिक्षकांनी सर्वसाधारण बदल्यांतर्गत संवर्ग १ मध्ये गणले जाण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचे मूळ प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, गंभीर आजाराचे प्रमाणपत्र सादर केले होते.
लाभासाठी टक्का वाढविला
२५ टक्के दिव्यांगत्व असणाऱ्यांनी सवलती लाटण्यासाठी टक्का वाढविल्याचे निदर्शनास आले. ऑनलाईन बदली प्रक्रियेच्या अर्जासोबत दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत आणि स्वरातीच्या अपंग मंडळाने केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पुनर्तपासणी अहवालातील दिव्यांग टक्केवारीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने आत्तापर्यंत एकूण ७८ शिक्षकांवर कारवाई झाली.
बोगसगिरी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
जे खरे दिव्यांग आहेत तसेच शासकीय लाभासाठी निकषानुसार जे पात्र आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये. तसेच बनावट आणि जास्तीचा टक्के वाढवून लाभ लाटणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. – महादेव सरवदे, राज्य उपाध्यक्ष, दिव्यांग कर्मचारी संघटना, बीड
शिक्षकांसह इतर विभागही रडारवर
शिक्षकांची बोगसगिरी उघड झाल्यानंतर आता उर्वरित लाभ घेणारे शिक्षक तसेच अन्य विभागातील कर्मचारी रडारवर आहेत. याबाबत चौकशी आणि पडताळणीसाठी लवकरच पावले उचलली जाणार असल्याचे अधिकारी सांगतात.
खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर होऊ शकतो अन्याय
फेरतपासणीवेळी दृश्यात्मक व पूर्णतः दिव्यांग कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला. मोठ्या प्रमाणात बोगसगिरी फोफावल्याने खऱ्या दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घेण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे विविध संघटनांनी मागणी केली होती.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
महसुली खात्यातील दिव्यांनी कर्मचाऱ्यांची पन तपासनीस झाली पाहिजे