शेतकरी कुटुंबातील रावसाहेब शेंडगे यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी – बाळासाहेब सरगर
कन्हेर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कन्हेर सरगरवाडी येथील रावसाहेब शेंडगे यांनी हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांच्या कंपनीमार्फत स्विझर्लंड, इटली, जर्मनी या तीन देशाचा एक महिना केलेला प्रवास सामान्य कुटुंबातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी सरगरवाडी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभामध्ये बोलताना व्यक्त केले.


रावसाहेब शेंडगे यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरगरवाडी या ठिकाणी झाले. तर पुढील शिक्षण हलाखीची परिस्थिती असल्याने मामाच्या गावी गिरवी प्राथमिक शाळा पिसेवस्ती येथे सातवीपर्यंत झाले. तर आठवी ते दहावी रंगनाथ कुलकर्णी विद्यालय गिरवी येथे झाले.
अकरावी व बारावी हे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय देवापुर, ता. माण येथे झाले. बारावीला चांगले मार्क्स मिळाल्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी परिक्रमा कॉलेज आष्टी, जि. अहमदनगर येथे झाले. ते एचआरएसफ्लो कंपनीमध्ये डिझाईन इंजिनिअरिंग म्हणून जॉबला लागले. त्यांचं काम पाहून कंपनीमार्फत स्वित्झर्लंड, जर्मनी आणि इटली या देशांमध्ये पुढील अनुभव घेण्यासाठी एक महिन्यासाठी प्रशिक्षत म्हणून निवड करण्यात आली होती.


रावसाहेब शेंडगे यांचे कुटुंब सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. आई वडील शेती करून उदरनिर्वाह करतात. बाहेरच्या देशातून प्रशिक्षण घेऊन आल्याने तरुणांनी त्यांच्यापासून बोध घ्यावा, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचा आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या सत्कार समारंभ प्रसंगी वडील अशोक शेंडगे, महादेव सरगर, अर्जुन शेंडगे, पीनेश काळे, बाळासो शेंडगे, अंबादास शेंडगे, प्रमोद शेंडगे, अविनाश शेंडगे, रावसाहेब काळे, हनुमंत शेंडगे, भीमराव शेंडगे, विठ्ठल शेंडगे, रामदास सरगर आदी उपस्थित होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
