Uncategorized

श्री. अरूण सुगांवकर, पोलीस यंत्रणेतील संवेदनशील अधिकारी

माळशिरस (बारामती झटका)

लेखक गौतम कोतवाल यांचे ‘समर – लढा कोरोना विरुद्धचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यांच्या पुस्तकातील अकलूज (ता. माळशिरस) पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या कार्याची माहिती जिल्ह्यातील व तालुक्यातील समाज माध्यमांना माहिती व्हावी यासाठी हा लेख पुनर प्रसारित करण्यात आलेला आहे.

‘जित की खातिर बस जुनून चाहिए, जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिए, वह आसमान भी आयेगा जमीनपर, बस इरादो में जीत की गुंज चाहिए…’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक आव्हानाचा सामना करत प्रशासकीय सेवेतील जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडणारी व्यक्ति म्हणजे अरुण सुगांवकर. ते सध्या अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अचानक कोसळलेल्या कोरोना महामारीच्या संकटात योग्य निर्णय घेत प्रशासकीय खात्याच्या मदतीने कायदा, सुव्यवस्था व नियमांची काटेकोर अंमलबजावणी त्यांनी केली.

प्रशासकीय सेवेचे क्षेत्र नेहमीच अरुण सुगांवकर यांच्यासाठी एक आकर्षण ठरलं‌ प्रशासकीय सेवा हे लोकांची सेवा करण्याचे एक उत्तम माध्यम आहे, याची खून गाठ त्यांनी मनाशी बांधली होती. त्यामुळे बँकेत नोकरी लागूनही त्यावरच समाधान न मानता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. त्यांच्या आजपर्यंतच्या सेवाकाळात अनेक महत्त्वपूर्ण कारवाया करत अनेक गुन्हे त्यांनी निकाली काढले आहेत. जाणून घेऊयात त्यांचा थोडक्यात प्रवास…

अरुण सुगांवकर यांचा जन्म पुण्यात २ मे १९७५ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील शिवदास सुगांवकर हे रेसकोर्समध्ये कामाला होते तर, त्यांची आई पार्वती गृहिणी असून त्यांना चार बहिणी आहेत. अरुण यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यातच झालं. कॉलेजमध्ये शिकत असतानाच स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र त्यांना खूणावू लागलं. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला त्यांनी सुरुवात केली. दरम्यानच्या काळात दोन-तीन वर्ष स्पर्धा परीक्षेची कुठल्याही पदासाठी जाहिरात आली नाही. अजून किती वेळ असाच फक्त अभ्यास करण्यात घालवायचा, नोकरी करणंही तितकंच गरजेचं होतं. हा विचार करून ते पुण्यातील विद्या सहकारी बँकेत जॉईन झाले. नोकरी करता करता अभ्यास व परीक्षा देणं सुरूच होतं. या काळात बँकेतील सहकारी, अधिकारी यांनी देखील त्यांना चांगली साथ दिली. परीक्षेच्या वेळी रजादेखील त्यांना बँकेकडून मिळाली. चार-पाच वर्ष सर्व काही असं सुरू होतं. पण म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर ! अगदी तसंच अरुण यांच्या बाबतीत घडलं. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. प्रशासकीय सेवेसाठी त्यांची नियुक्ती झाली.
नाशिक येथील पोलीस उपनिरीक्षक या पदाचं प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली पोस्टिंग कोतवाली पोलीस ठाणे नागपूर शहर इथे झाली. तर २००६ ते २००९ या काळात ते तिथं कार्यरत होते. पुण्यापेक्षा नागपूर हे पूर्णपणे भिन्न. तिथलं वातावरण, भाषा, जेवण पूर्ण वेगळं होतं. अरुण यांनी सुरुवातीला केलेली बँकेतील नोकरी आणि प्रशासकीय सेवेतील नोकरी यात खूप तफावत होती. बँकेत एसीमध्ये बसून लोकांशी संवाद साधणे, कार्यालयीन काम करणे असं त्यांचं काम होतं. पण पीएसआय पदावर काम करताना उन्हातान्हात बंदोबस्तासाठी फिरणं, लोकांना कडक शब्दात सांगणं हा त्यांच्या नोकरीचा भाग होता. दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावे लागले.

पुढे नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन क्यूआरटी विभाग या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांची बदली किल्ला पोलीस ठाणे, मालेगाव (नाशिक ग्रामीण) या ठिकाणी झाली. तिथं वर्षभर काम केल्यानंतर त्यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण या ठिकाणी झाली. प्रशासकीय सेवेत विविध ठिकाणी होणारी बदली आणि तिथे येणारे विविध अनुभव या सर्व प्रक्रियेतून प्रत्येक अधिकारी जात असतो, असेच अनेक अनुभव अरुण यांच्याही वाट्याला आले. त्यातील एक अनुभव म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेत काम करत असताना एका आईने, मुलांने न सांगता बँकेतून पैसे काढले म्हणून मुलाविरुद्ध तक्रार दिली होती. मोठी रक्कम असल्यास बँकेतील कर्मचाऱ्याने संबंधित खातेदाराला विचारूनच पैसे खात्यातून डेबिट करावे, असा नियम आहे. या केसमध्ये बँकेतील कर्मचाऱ्याने कोणतीही खात्री न करता मुलाला पैसे दिले, ही घटना घडल्यानंतर तीन वर्षांनी अरुण यांनी या केसचा तपास लावून बँक कर्मचाऱ्याला अटक केली. या केसमध्ये त्यांना बँकेतील नोकरीचा अनुभव कामी आला.

सन २०१७ मध्ये पोलीस निरीक्षक या पदासाठी पदोन्नती मिळून नागपूर शहरात त्यांची बदली झाली. हिंगणा पोलीस ठाणे, नागपूर शहर इथं पोलीस निरीक्षक (गुन्हे) या पदावर दोन वर्ष काम केलं. त्यानंतर सन २०१९ मध्ये त्यांची बदली सोलापूर ग्रामीण या ठिकाणी झाली. सन २०१९ मध्ये अरुण हे पोलीस निरीक्षक म्हणून वैराग पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुन्हे प्रलंबित होते. मात्र अपुरे मनुष्यबळ असतानाही त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करून त्यांनी कामाचा वेग वाढवला. त्यांनी केलेल्या कारवाया व गुन्ह्यांच्या तपासामुळे वैराग पोलीस ठाण्याची ओळख बदलल्यामुळे जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून गौरवण्यात आले होते.

सन २०२१ मध्ये त्यांची बदली अकलूज पोलीस ठाणे येथे झाल्यानंतर त्यांनी अकलूज पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या नियंत्रण, चायनीज मांजा प्रकरण, वाळूचे गुन्हे, गुटखाबंदी, कॉलेजमध्ये जाऊन कायदेविषयक शिबिर, एनसीसीच्या मुलांना मार्गदर्शन, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना असे अनेक विविध उपक्रम व योजनांच्या माध्यमातून त्यांनी अकलूज पोलीस ठाणे हद्दीत शांतता प्रस्थापित करण्यात मोलाचा हातभार लावला आहे.

कोरोना काळातील योगदान
वैराग पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कोरोनाची पहिली लाट आली. आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस प्रशासनावरही या काळात खूप मोठी जबाबदारी आली. त्यावेळी महसूल व आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधत वेळोवेळी लोकांशी संवाद साधून कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृती केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वैराग पोलीस ठाणे हद्दीतील काही व्यक्ती या दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परत आले असता व दिल्ली या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढले असल्यामुळे सोलापूर ग्रामीणमध्ये कोविड या आजाराचा पेशंट सापडला. अशा बातमीमुळे संशयित व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या स्टाफद्वारे ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. त्यानंतर पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांना जागरूक राहण्याबाबत तसेच संशयित इसमांबाबत तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांबाबत माहिती देण्याबद्दल आवाहन केले. व ज्या ठिकाणी रुग्ण आढळत होते, त्या भागात जाण्या-येण्याबाबतचे निर्बंध लागू केले होते. लोकांना घरात थांबण्याचं आवाहन करण्याबरोबरच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील त्यांना करावी लागली.

या काळात ट्रेसिंग आणि टेस्टिंगचा प्रश्न हाताळणे हे खूप मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर होते. सुरुवातीला नागरिक टेस्टिंग करून घेण्यास घाबरत होते. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे काय होईल, अशी भीती नागरिकांना सतावत होती. टेस्टिंग दरम्यान हा संक्रमित आजार असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचेही महत्त्व आरोग्य व महसूल विभागाची मदत घेऊन पटवून देण्याची व्यवस्था अरुण यांनी केली होती. बार्शी मध्ये टेस्टिंग लॅब नव्हती, त्यामुळे स्वॅबचं सॅम्पल सोलापूरला पाठवावं लागत होतं. रिपोर्ट येण्यास दोन-तीन दिवसांचा कालावधी मध्ये जात असे. टेस्टिंग झाल्यानंतर जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत रुग्णाला क्वारंटाईन सेंटरमध्येच ठेवलं जायचं. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेऊन तिथं लोकांना क्वारंटाईन केलं होतं. रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल तरच, रुग्णाला घरी सोडलं जायचं. त्यामुळे दरम्यानच्या काळात रुग्ण आणि त्याचे नातेवाईक तणावात असायचे. बरेचसे नागरिक क्वारंटाईन करू नये म्हणून, ‘मला कोणतीही लक्षणे नाहीत’, असं सांगत. परंतु ते गावात जात असल्यामुळे पेशंटचे प्रमाण वाढत होते. अशावेळी आहे ती परिस्थिती स्वीकारा, आम्ही तुमची समस्या सोडवण्यासाठी आहोत, असं सांगून त्यांना धीर दिला जायचा. मात्र टेस्टिंगमुळे लवकर निदान झाल्यामुळे वेळेवर उपचार करणे शक्य झालं. त्याचबरोबर त्यांच्या जास्त संपर्कात असलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन केल्यामुळे मृत्युदर कमी राखण्यात यश मिळालं.

मुंबईहून अनेक कामगार हे कर्नाटकला जात होते. त्यांना थांबवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व त्यांच्या गावी परत पाठवण्याची सोय त्यांनी केली. तसेच गावातील पोलीस पाटील, आशा वर्कर्स यांच्याबरोबर सतत बैठका घेऊन स्थानिक पातळीवरील लोकांसाठी काय उपाय योजना राबवता येतील, याची चर्चा करून अंमलबजावणी केली. स्थानिक पातळीवर प्रत्येक घटकाचा विचार करून व सर्व यंत्रणेसोबत समन्वय साधून काम केल्यामुळे कोरोना लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. कोरोनाकाळात बेघर व स्थलांतरितांचा प्रश्न खूप बिकट होता. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्यामुळे पैशांची चणचण प्रत्येकाला सतावत होती. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा प्रश्न खूप मोठा होता. यासाठी गावातील स्थानिक नेत्यांची मदत घेऊन बेघर, स्थलांतरितांसाठी लाईट, पाणी, जेवणाची सोय त्यांनी केली. विनापास लोकांना लॉकडाऊनच्या काळात कुठेही जाता येत नव्हते. त्यामुळे लोकांना पास काढून देण्यासाठी देखील त्यांनी मदत केली. अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने गरीब, बेघरांना धान्य व जेवण त्यांनी पुरविले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान अरुण यांची अकलूज येथे पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली. अकलूज हे मेडिकल हब असल्याने आजूबाजूच्या तालुक्यातून व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोविड पेशंट अकलूज या ठिकाणी येत होते. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसत. त्यामुळे नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. यावेळी मेडिकल असोसिएशन अकलूज यांच्यासोबत नियमित संपर्क ठेवून तसेच विविध हॉस्पिटल सोबत समन्वय साधून पेशंटला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यास मदत केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यावेळी महसूल यंत्रणेमार्फत ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. त्यांच्यासोबत समन्वय साधून ज्या हॉस्पिटलला गरज आहे अशा ठिकाणी त्यांना योग्य तो बंदोबस्त देऊन त्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर पोहोचविण्यास मदत केली. तसेच रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यास मदत केली. हॉस्पिटलमध्ये कोविडचे पेशंट मोठ्या प्रमाणात ऍडमिट होते. त्यावेळी त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी करून उभे असत. अशावेळी वेळोवेळी हॉस्पिटलच्या ठिकाणी भेट देणे, डॉक्टरांसोबत संवाद साधने, नातेवाईकांना ज्या गोष्टींची गरज आहे अशा गोष्टी उपलब्ध करून देण्याबाबत माहिती देणे व त्यांच्यामध्ये हॉस्पिटल व डॉक्टरांबद्दल रोष निर्माण होणार नाही, यासाठी वेळोवेळी भेट घेऊन संवाद साधला.

डॉक्टरांकडून अवाजवी फी आकारणीच्या तक्रारी आल्यानंतर सर्व डॉक्टरांची महसूल व आरोग्य यंत्रणेसोबत मीटिंग घेऊन शासनाच्या नियमांप्रमाणे रुग्णांकडून फी आकारणी करण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या. त्यामुळे अतिरिक्त फी आकारणीवर निर्बंध आले व रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. कोरोना काळात रेमडेसीव्हर इंजेक्शनच्या वितरणाची जबाबदारी महसूल प्रशासनावर होती.

रेमडेसीव्हर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड दमछाक होत होती‌. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काहीजण रेमडेसिव्हरची विक्री चढ्या दराने काळाबाजारत करत होते. एका इंजेक्शनसाठी लोकांना ३५ ते ४० हजार रुपये मोजावे लागत होते. याबाबत माहिती मिळताच अरुण यांनी सापळा रचून १० लोकांना पकडलं व त्यांच्याकडून नऊ इंजेक्शन ताब्यात घेतली व त्याबाबत गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई केल्यामुळे इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला आळा बसला. सोलापूर जिल्ह्यात पहिली कारवाई असल्यामुळे अरुण यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button