राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख व नावलौकिक कमावला – कवी बाबासाहेब लोंढे
राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा विशेष सत्कार
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या अभ्यासू, परखड, निर्भिड, वाचनीय व वस्तुनिष्ठ लेखणीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे त्यांची पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख व वेगळा नावलौकिक निर्माण झाल्याचे गौरवोद्गार कवी बाबासाहेब लोंढे यांनी काढले आहेत.
ते पत्रकार राजेंद्र गुंड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्काराच्या वेळी बोलत होते.

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे म्हणाले की, पत्रकार राजेंद्र गुंड यांनी मानेगाव परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्यांना वेळोवेळी लेखनीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. तसेच या भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने लेखनीतून प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. या भागातील सर्व प्रकारच्या बातम्यांना स्थान देण्याची त्यांची भूमिका असते. राजेंद्र गुंड हे पत्रकार झाल्यापासून मानेगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव, स्थानिक पुढारी व कार्यकर्ते आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांना पेपरमध्ये विशेष वाव मिळाला आहे. भविष्यातही त्यांनी अशाच प्रकारे लेखनीतून सर्वसामान्य जनता व कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या मांडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कवी बाबासाहेब लोंढे, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, अमोल कोळी, सौदागर गव्हाणे, नेताजी उबाळे, सतीश गुंड यांच्यासह युवक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng