लंपी आजाराने बैल दगावला, खरीप हंगामाच्या तोंडावर बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
उमरखेड (बारामती झटका)
लंपी आजाराची लागण झाल्याने बैलाचा मृत्यु झाल्याची घटना उमरखेड तालुक्यातील कोपरा (बु..) येथे दि. २५मे रोजी घडली असुन बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोपरा (बु.) येथील शेतकरी गणेश बापुराव कदम यांच्याकडे शेतीच्या कामासाठी बैल जोड असुन त्यापैकी एका बैलाला दहा दिवसांपुर्वी लंपी रोगाची लागण झाली होती. त्यामुळे तालुका पशुसंवर्धन विभागाच्यावतीने या आजारग्रस्त बैलावर उपचार चालु असतांनाच गुरुवार दि. २५ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान या बैलाचा मृत्यु झाला. याची माहिती मिळताच तालुका पशुधन विस्तार अधिकारी डॉ. कुंभारे यांनी मृत बैलाचे शवविच्छेदन केले आहे.
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बैलाचा मृत्यु झाल्याने शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असुन शासनाच्या वतीने नुकसानभरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकरी करीत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng