सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील अंतिम वर्ष पदवी कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दि. २७/०६/२०२३ रोजी हॉटेल चेहिता रिसॉर्ट, संग्रामनगर, अकलूज येथे संपन्न झाला. निरोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालय, माळेवाडी, अकलूजचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख हे लाभले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे, कार्यालयीन अधिक्षक श्री. शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
निरोप समारंभाची सुरूवात सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (अक्कासाहेब) यांच्या प्रतिमापुजनाने झाली. त्यानंतर डॉ. आबासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहिले पाहिजे. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगामध्ये जिद्द, चिकाटी, दृढ निश्चय ठेवून उतरले पाहिजे असे सांगीतले.
यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थी, सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच काॅम्प्युटर पदवी अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चि. अमसिद्ध बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. श्रावणी बाबर हिने केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संगणक अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा कु. दिया रणवरे व सर्व सदस्य यांनी विशेष परीश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng