पोक्सोपासून सायबर सुरक्षेपर्यंत; चांदापुरीत विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे

चांदापुरी (बारामती झटका)
विद्यार्थ्यांच्या मनात कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, आपल्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी आणि बदलत्या काळातील कायदेशीर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम नागरिक घडावेत, या उद्देशाने विधी सेवा फाऊंडेशनच्या वतीने सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, चांदापुरी येथे मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, पोक्सो कायदा, विद्यार्थ्यांचे कायदेशीर हक्क व जबाबदाऱ्या, सायबर सुरक्षा, महिलांचे व बालकांचे संरक्षण करणारे कायदे तसेच दैनंदिन जीवनात कायद्याचा उपयोग याबाबत अत्यंत सोप्या व संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

“अडचण निर्माण झाल्यानंतर कायदा शोधण्यापेक्षा, अडचण येण्यापूर्वी कायदा समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे,” या भूमिकेतून विद्यार्थ्यांना विविध कायदेशीर बाबी समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना उपस्थित विधिज्ञांनी कायदेशीर मार्गदर्शनातून उत्तरे दिली.
‘कायदा प्रत्येकासाठी, न्याय सर्वांसाठी’ या संकल्पनेतून विधी सेवा फाऊंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या कायदेविषयक जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी विधी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय बाबर, उपाध्यक्ष ॲड. भारत गोरवे, सचिव ॲड. सुमित सावंत, खजिनदार ॲड. वैशाली कांबळे, सहसचिव ॲड. गोपाळ लावंड, संस्थापक सदस्य ॲड. अभिषेक चंदनशिवे व ॲड. सुप्रिया पोळ उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



