ताज्या बातम्याराजकारण

मोहिते-पाटील ब्रँड खरंच असेल तर रणजितसिंहांनी पदवीधर मतदारसंघात नशीब आजमावावे; शिवरत्नवरील बैठकीत कार्यकर्त्यांनी आग्रह धरावा!

दिल्ली ते अकलूज गल्ली एवढंच उरलंय राजकारण? दोन्ही कारखान्यांच्या कार्यक्रमाला एकही आमदार नाही, तरीही ब्रँडच्या वल्गना!

अकलूज (बारामती झटका)

मोहिते-पाटील ब्रँड खरंच असेल तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रणजितसिंह यांनी नशीब आजमावावे; समर्थकांनी बैठकीत आग्रह करावा, नेत्यांचा कार्यकर्त्यांना राजकीय अंदाज येईल

माजी आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरत्न बंगल्यावर पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधर नोंदणी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आज गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. सदर बैठकीस सर्व प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, संस्थांचे पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे.

24 सप्टेंबर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला.

त्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांनी व चेल्या-चपाट्यांनी आजच्या शिवरत्नवरील बैठकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात उभे राहण्याचा आग्रह धरावा, अशी चर्चा माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण पुणे पदवीधर मतदारसंघात सुरू आहे. मोहिते-पाटील खरंच ब्रँड असतील तर या निवडणुकीत नशीब आजमावून दाखवावे.

सुवर्णकाळ ते अधोगतीचा प्रवास
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा राजकीय काळ हा सुवर्णकाळ होता. मात्र तिसऱ्या पिढीतील चुकीचे निर्णय व धोरणांमुळे राजकारणाचा स्तर खालावत गेला. एकेकाळी शिवरत्न बंगला हा सत्तेचा केंद्रबिंदू होता, पश्चिम महाराष्ट्रात स्व. वसंतदादांचा गट म्हणून विजयदादांकडे पाहिले जात होते.

आज पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातही मोहिते-पाटील यांच्या राजकारणाची काय अवस्था आहे ? जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी मोहिते-पाटील यांचे नाव घेऊन राजकारण करत नाही. जिल्हा सोडा, तालुक्यातही तीच परिस्थिती आहे. अकलूज नगरपरिषदेची सत्ता सोडली तर तालुक्याच्या राजकारणातही अधोगतीच पहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद गट स्थापन करताना एका बाजूला 5 सदस्य, तर मोहिते-पाटील गटाकडे फक्त 2 सदस्य राहिले आहेत. पंचायत समितीतही तीच अवस्था आहे. अशी दयनीय अवस्था असतानाही स्वार्थापोटी चेले-चपाटे आपल्याला ठेकेदारी मिळावी, कॉन्ट्रॅक्ट मिळावे, गाळा मिळावा किंवा मिळालेला गाळा टिकावा यासाठी चुकीच्या निर्णयाचेही समर्थन करतात.

दुसऱ्यावर वाईट कमेंट करून मोहिते-पाटलांचे राजकारण सुधारणार नाही. सध्या त्यांचे राजकारण “दिल्ली ते अकलूज गल्ली” एवढेच उरले आहे, दिल्ली व गल्ली मधील राजकारण संपले आहे. दोन्ही कारखान्यांचे कार्यक्रम झाले, एकही आमदार उपस्थित नव्हता, यावरून कार्यकर्त्यांना राजकीय अंदाज येणे अपेक्षित आहे.

यासाठीच आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आग्रही राहून, मोहिते-पाटील खरंच ब्रँड असेल तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नशीब आजमावावे, यासाठी आग्रह करावा.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button