दुष्काळग्रस्त भागातील 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

राज्य मंडळाकडून परीक्षा शुल्क माफ
पुणे (बारामती झटका)
राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (पुणे) दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सन २०२६ मधील दुष्काळामुळे बाधित ३०५ तालुक्यांतील इयत्ता १०वी (SSC) आणि १२वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी/मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क (Exam Fee) पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्क माफीचा लाभ –
शाळा/कॉलेज प्रकार – शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी.
पुनर्परीक्षार्थी व बहिःस्थ – १०वी-१२वी चे रिपीटर्स (Repeater) आणि फॉर्म नंबर १७ भरून प्रविष्ट होणारे बहिःस्थ (External) विद्यार्थी.
शहरी/इतर भागात शिकणारे –
जे विद्यार्थी शहरात किंवा इतर ठिकाणी शिकत आहेत, परंतु त्यांचे मूळ गाव किंवा पालकांची शेतजमीन दुष्काळग्रस्त तालुक्यात आहे, अशा विद्यार्थ्यांनाही ही माफी लागू राहील.
SC/ST विद्यार्थी – दुष्काळग्रस्त भागातील अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्जही विनाशुल्क भरून घेतले जातील व त्यांचे शुल्क शासन विभागाकडून प्राप्त करून घेतले जाईल.
मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाच्या सूचना व कारवाई –
१. ७ दिवसांत अर्ज प्रक्रिया : शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी/प्राचार्यांनी पुढील ७ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी
२. सिस्टममध्ये नोंद : पात्र विद्यार्थ्यांची माहिती भरताना मंडळाच्या Institute Login मध्ये Application => Drought Entry /दुष्काळग्रस्त नोंद या पर्यायामध्ये नोंद करणे बंधनकारक आहे.
३. शुल्क भरले असल्यास परतावा : जर दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क आधीच भरले असेल, तर ते शुल्क त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट वर्ग केले जाईल.
४. जमा शुल्क तात्काळ परत करा : शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून आधीच परीक्षा शुल्क जमा केले असल्यास आणि ते मंडळाकडे भरलेले नसल्यास, ते शुल्क विद्यार्थ्याना तात्काळ परत करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाने केवळ या वर्षापुरती विशेष बाब म्हणून उत्पन्नाच्या निकषात शिथिलता आणून ही सवलत लागू केली आहे. दुष्काळग्रस्त ३०५ तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मात्र नियमित मुदतीत परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



